कलोते-विनेगाव व तासगाव आदिवाडी येथे जिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्याहस्ते आदि कर्मयोगी अभियानाचा शुभारंभ
रायगड(जिमाका),दि.18:-:आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकारने 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन हा राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम सुरू केला आहे. रायगड जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 113 गावांमध्ये हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविला जाणार आहे. यामुळे जिल्ह्यात आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन कार्यक्रमाला सुरुवात झाली असून रायगड जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात आज विकासाची नवी पहाट उगवली आहे. या आदि कर्मयोगी अभियानाचा शुभारंभ (दि.17 सप्टेंबर रोजी) खालापूर तालुक्यातील कलोते-विनेगाव कातळाची वाडी तसेच माणगाव तालुक्यातील तासगाव आदिवासी वाडी येथे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, उपविभागीय अधिकारी माणगाव संदीपान सानप, सानप, तहसीलदार श्री.काळे, गटविकास अधिकारी श्रीम. शुभदा पाटील, खालापुर तालुक्याचे तहसीलदार. अभय चव्हाण, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच ब्लॉक मास्टर ट्रेनर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, आदि कर्मयोगी अभियान, महसूल विभागाचे राजस्व अभियान व ग्रामविकास विभागाचे मुख्यमंत्री पंचायतराज अभियान यांचा उद्देश तळागाळातील आदिवासी बांधवांना सशक्त करणे व गावांचा सर्वांगीण विकास साधणे त्याचप्रमाणे शासनाच्या सर्व योजनांचा लाभ पोहोचवणे हा आहे." गावकऱ्यांनी विकासाच्या प्रवासात सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. या कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्याहस्ते धरती आबा योजनेंतर्गत दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद झळकत होता. आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात सामील करून घेणाऱ्या या अभियानामुळे गावात आशा व आत्मविश्वासाची नवी ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी केले. तर सहायक प्रकल्प अधिकारी श्रीम. तेजस्विनी गलांडे यांनी गाव विकास आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले.
०००००००

Comments
Post a Comment