नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 प्रमाणे बंदी आदेश जारी

 

रायगड-अलिबाग,दि.28 (जिमाका):- मा.राज्य निवडणूक आयोगाने दि.04 नोव्हेंबर, 2025 रोजीच्या आदेशान्वये राज्यातील नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत हद्दीमध्ये मंगळवार दि.02 डिसेंबर 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक निकाल जाहिर होईपर्यंत आचारसंहिता अंमलात राहणार असून, निवडणूक खुल्या व निर्भय वातावरणात पार पाडणे तसेच मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावता येणे आवश्यक आहे. याकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 नुसार जिल्ह्यातील (पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात) नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 च्या अनुषंगाने दि.02 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूकीच्या मतदान समाप्तीकरीता निर्धारित केलेल्या वेळेच्या 48 तास अगोदरच्या कालावधीमध्ये खालील कृती करण्यास मनाई जारी केला आहे.

 पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमण्यास किंवा फिरण्यास मनाई आहे. निवडणूक प्रचार करणे, सार्वजनिक सभा, बैठका घेणे इत्यादी कृतीस मनाई आहे. (तथापी घरोघरी भेटी / प्रचारास मनाई नाही), राजकीय प्रचार करण्याच्या उद्देशाने बल्क मेसेज करण्यास मनाई आहे.  ज्या नगरपरिषद/नगरपंचायत हद्दीमध्ये मतदान होणार आहे, तेथे मतदार नसलेले राजकीय कार्यकर्ते / नेते यांना त्या नगरपरिषद/नगरपंचायत हद्दीमध्ये थांबण्यास मनाई आहे.. लाउडस्पीकर वापरास मनाई आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस मोबाईल फोन, वायरलेस किंवा इतर संपर्क साधने घेवून जाण्यास मनाई आहे. (निवडणुकीशी संबंधीत कामाकरिता नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी व सुरक्षेकरीता नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी वगळून). मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात लाउडस्पीकर,मेगाफोन वापरणे, आरडा-ओरड करणे, गोंधळ घालणे, गैरवर्तन करणे इत्यादी कृती करण्यास मनाई आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस शस्त्र घेवून जाण्यास मनाई आहे. (अपवाद -मतदान केंद्राच्या सुरक्षेकरिता नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी, ज्या व्यक्तीस SPG/Z+ दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. अशा व्यक्तीस साध्या वेशात एक सुरक्षा रक्षक शस्त्र लपवलेल्या स्थितीत घेवून जाता येईल). मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात आस्थापना चालू ठेवण्यास मनाई आहे. मतदारांना देण्यात येणारी चिठ्ठी पांढऱ्या कागदावर असावी. त्यावर कोणत्याही उमेदवाराचे नाव, पक्षाचे चिन्ह, पक्षाचे नाव नसावे. मतदान केंद्राच्या परिसरात पक्षाचे कार्यकत्यांचे निवासस्थाने असल्यास त्याठिकाणी प्रचार करणे, बैठका घेणे, मतदानाकरिता जाणाऱ्या मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी कोणतेही कृत्य करण्यास मनाई आहे. मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस वाहन आणण्यास मनाई आहे. (अपवाद अपंग /वृध्द / आजारी मतदारांना घेवुन येणारी वाहने). मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसराचे आत राजकीय पक्षांचे/उमेदवारांचे निवडणूक बुथ लावण्यास मनाई आहे. मतदान केंद्राच्या 200 मीटर बाहेर निवडणूक बुथ लावताना खालील अटींचे पालन करावे. बुथ लावण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घ्यावी व बुथ लावणेवावत निवडणूक निर्णय अधिकारी यांना आगावू माहिती द्यावी.  प्रत्येक बुथवर कमाल एक टेबल, दोन खुर्चा असाव्यात. बुथकरीता लावलेल्या मंडपाचा आकार 10 X 10 फुट पेक्षा जास्त नसावा.  प्रचार कालावधी संपल्यानंतर राजकीय पक्ष प्रचाराला भरीव चालना देण्यासाठी, मतदार संघाच्या बाहेरुन पाठीराख्यांना आणण्यासह त्यांच्या समर्थकांची हलवाहलव करतात. ही वस्तुस्थीती लक्षात घेता, प्रचार कालावधी संपल्यानंतर, मतदारसंघात कोणताही प्रचार होऊ नये यासाठी, बाहेरुन आणलेले आहेत व जे त्याच्या / तिच्या मतदारसंघाचे मतदार नाहीत असे राजकीय कार्यकर्ते/पक्ष कार्यकर्ते/ मिरवणुकीतील कार्यकर्ते/प्रचार कार्यकर्ते, इत्यादीना नियमितपणे मतदारसंघामध्ये उपस्थित राहता येणार नाही, कारण प्रचार संपल्यानंतर, त्यांच्या निरंतर उपस्थितीमुळे मुक्त व निष्पक्ष मतदानाचे वातावरण धोक्यात येऊ शकते.

 हा मनाई आदेश रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील (पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात) नगरपरिषद / नगरपंचायत मतदार संघाच्या हद्दीत दि.30 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.00 वा. पासून ते दि. 02 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7.00 वा. पर्यंत अंमलात राहील. तसेच या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत