"हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम" शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाची तयारी सुरू 21 डिसेंबर रोजी होणार खारघर येथे भव्य कार्यक्रम

 


 

रायगड-अलिबाग,दि.03(जिमाका):- "हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम" शताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यात दि.21 डिसेंबर 2025 रोजी खारघर येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व "हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी 350 वी शहिदी समागम शताब्दी राज्यस्तरीय समिती", शीख-सिकलीकर, बंजारा लमाण, मोहियाल, सिंधी व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे सूक्ष्म नियेाजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज आढावा बैठकीत दिले.

              यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ.रविंद्र शेळके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निशिकांत पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष तर काही अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

              जिल्हाधिकारी किशन जावळे पुढे म्हणाले की,  हिंद-की- चादर श्री. गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त राज्यात नांदेड, नागपूर व नवी मुंबई या तीन ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमाकरिता क्षेत्रीय आयोजन समिती स्थापन करण्यात येत असून या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनाकरिता वेळोवेळी आढावा घेवून कालबद्ध कार्यक्रम निश्चित करणे, कार्यक्रमाच्या अनुषंगाने मार्गदर्शक समिती तसेच आयोजन व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यासाठी जिल्हास्तर आयोजन व व्यवस्थापन समितीस शिफारस करून त्यांची वेळोवेळी आढावा बैठक घेणे व त्याची माहिती राज्यस्तरीय समितीस व अल्पसंख्याक विकास विभागास सादर करावयाची आहे.

              या कार्यक्रमाचे योग्य नियोजन, परिणामकारक अंमलबजावणी याकरिता आयोजन समन्वय समिती, व्हीआयपी व्यवस्थापन समिती, सभागृह व्यवस्थापन समिती, प्रशासन व्यवस्थापन समिती, मैदान व्यवस्थापन समित्ती, मंडप व्यवस्थापन समिती, बैठक व स्वागत व्यवस्थापन समिती, अतिथी व्यवस्थापन समिती, निवास व्यवस्थापन समिती, नाव नोंदणी व्यवस्थापन समिती, प्रदर्शनी व्यवस्थापन समिती, प्रचार व प्रसार व्यवस्थापन समिती, दक्षता व्यवस्थापन समिती, महिला सुरक्षा व्यवस्थापन समिती, आपात्कालीन व्यवस्थापन समिती, पाणीपुरवठा व्यवस्थापन समित्ती, स्वच्छता व्यवस्थापन समिती, स्वरुपा व्यवस्थापन समिती, सार्वजनिक परिवहन व्यवस्थापन समिती, जूताघर व्यवस्थापन समिती, लंगर व्यवस्थापन समिती तसेच स्थानिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.

            आपल्या जिल्ह्याला या कार्यक्रमाच्या आयोजनाची ही उत्तम संधी मिळाली असून सर्व यंत्रणांनी मिळून हा कार्यक्रम अत्युत्कृष्ट होईल, यासाठी एकदिलाने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शेवटी केले.

००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत