“आजच्या डिजिटल काळात आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिस्त ही काळाची गरज— जिल्हाधिकारी किशन जावळे

 


रायगड-अलिबाग, दि.२७ (जिमाका): आजच्या डिजिटल युगात आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिस्त ही काळाची गरज बनली असून प्रत्येक नागरिकाने उत्पन्नाचे योग्य नियोजन, खर्चावर नियंत्रण, गुंतवणुकीचे भान आणि कर्जाचे जबाबदारीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.

Reserve Bank of India, Mumbai आणि जिल्ह्याची अग्रणी बँक Bank of India यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 24 एप्रिल 2026 रोजी प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित Training of Trainers (ToT) कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद रायगड यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले, उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, रिझर्व्ह बँकेच्या उपमहाप्रबंधक डॉ. ज्योती सक्सेना, बँक ऑफ इंडिया रायगड विभाग प्रमुख दीपनविता सहानी, उप विभागीय प्रमुख भारत सहाय, जिल्हा अग्रणी प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी, तसेच रिझर्व्ह बँकेचे रायगड जिल्हा अधिकारी विशाल गोंडखे, बेंजामिन डिकोस्टा, विविध शाळांतील शिक्षक, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि बँकिंग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. जावळे यांनी सांगितले की, आर्थिक शिस्त ही केवळ बचतीपुरती मर्यादित नसून उत्पन्नाचे नियोजन, खर्चावर नियंत्रण, योग्य गुंतवणूक आणि कर्ज व्यवस्थापन या सर्व बाबींचा त्यामध्ये समावेश होतो. बदलत्या आर्थिक परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने आर्थिकदृष्ट्या सजग राहणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून आर्थिक साक्षरतेची जाणीव निर्माण करण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून बचतीचे महत्त्व, बँकिंग व्यवहार आणि विविध शासकीय योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिल्यास भविष्यात जबाबदार नागरिक घडण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध आर्थिक समावेशन योजनांचा उल्लेख करून Pradhan Mantri Jan Dhan Yojana, विमा योजना, पेन्शन योजना आणि डिजिटल व्यवहारांचा व्यापक प्रसार करण्याचे आवाहन केले. तसेच डिजिटल व्यवहार करताना सायबर सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना रिझर्व्ह बँकेच्या उपमहाप्रबंधक डॉ. ज्योती सक्सेना यांनी सांगितले की, या प्रशिक्षणाद्वारे शिक्षकांना बँकिंग व्यवहारांचे ज्ञान, डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी तसेच रिझर्व्ह बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन आर्थिक साक्षरतेत सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. शिक्षक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने शालेय शिक्षणाबरोबर आर्थिक साक्षरतेचे ज्ञान दिल्यास पुढील पिढी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

या प्रशिक्षणामध्ये रिझर्व्ह बँकेविषयी माहिती, ग्राहकांच्या ठेव रकमेबाबत डीआयसीजीसी (DICGC) संदर्भातील माहिती, डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी तसेच खऱ्या नोटा ओळखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिझर्व्ह बँकेचे अधिकारी विशाल गोंडखे यांनी केले, तर जिल्हा अग्रणी प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले व उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून उर्वरित शिक्षकांसाठी जिल्हाभर अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून संपूर्ण जिल्हा आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन