जिल्हाधिकारी कार्यालयातील कोविड-19 हेल्पलाईन कक्षात मिळणार रॅपिड ॲन्टिजन टेस्टची सुविधा

 


अलिबाग, दि.5 (जिमाका):- करोना विषाणूचा ओमायक्रॉन प्रकार आता जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात वेगाने पसरणारा प्रकार म्हणून समोर आला आहे. राज्यात कोविड-19 ची प्रकरणेही वाढू लागली आहेत. जिल्ह्याच्या दि.4 जानेवारी 2022 च्या कोविड अहवालानुसार जिल्ह्यात विद्यमान रुग्ण 1 हजार 890 असून 702 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.  दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने परिस्थिती निश्चितच चिंताजनक बनत चालली आहे.

याकरिता जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी तात्काळ औषधोपचाराबरोबरच कोविड लसीकरण, ॲन्टिजन व आरटीपीसीआर टेस्ट करुन घेणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजला येथे कोविड-19 हेल्पलाईन कक्ष काल (दि.04 जानेवारी) रोजी सुरु करण्यात आला असून जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी या कोविड-19 हेल्पलाईन कक्षातच रॅपिड ॲन्टिजन टेस्टची सुविधा सुरु करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांना दिले आहेत. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच अभ्यागतांसाठी रॅपिड ॲन्टिजन टेस्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

याशिवाय या कक्षातून 9404815218, 9421852218, 9423712218, 8275544218 या हेल्पलाईन क्रमांकाद्वारे नागरिकांना कोविड बेड व्यवस्थापन, गृह विलगीकरण व कोविड-19 बाबत जिल्हा प्रशासनाकडून माहिती मिळू शकणार आहे.

तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा तसेच आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, कोविड अनुरुप वर्तनाचे काटेकोर पालन करावे, कायम मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सामाजिक अंतर पाळावे, आगामी काळात कोणतेही कार्यक्रम, सण साजरे करण्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने एकत्र येवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक