मानव-बिबटया संघर्ष कमी करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक --जिल्हाधिकारी किशन जावळे
रायगड-अलिबाग,दि.17 (जिमाका) :- वन्य प्राण्यांचा हल्ला होवू नये, याकरिता नागरिकांना सतत जागरुक केले जात आहे. या सर्व उपाययोजना जिल्ह्यातील वन विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासन, संयुक्त वनव्यवस्थापन समित्या, महसूल, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिक यांच्याशी समन्वय ठेवून, सहकार्याने प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. तरी या सर्व प्रक्रियेत मानव-बिबटया संघर्ष कमी करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित रायगड जिल्ह्यातील बिबटयाचा वाढता उपद्रव व त्याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल (दृरदूश्यप्रणालीद्वारे), उप वनसंरक्षक अलिबाग राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रियदर्शनी मोरे, उप वनसंरक्षक रोहा डॉ.शैलेंद्रकुमार जाधव हे उपस्थित होते. तर कांदळवन विभागाच्या विभागीय वनअधिकारी कांचन पवार या दृरदूश्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या.
मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी जिल्ह्यातील वन विभागांकडून विविध प्रतिबंधात्मक आणि संरक्षणात्मक उपाययोजना राबविण्याबाबतच्या सूचना संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना देत जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की, बिबट्याच्या उपस्थितीबाबत माहिती प्राप्त होताच विशेष बचाव पथकांची नियुक्ती करणे, पिंजरे उभारणे, संवेदनशील भागांत गस्त घालणे, जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे, शाळा व ग्रामस्तरावर मार्गदर्शन करणे, निरीक्षणासाठी ट्रॅप कॅमेराचा वापर करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी विशेष बचाव पथक कार्यरत ठेवणे आदि सूचनाही संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना श्री.जावळे यांनी दिल्या. मानव-वन्यजीव संघर्षप्रवण क्षेत्रांची ओळख, वर्गीकरण व नकाशीकरण करून, पगमार्क, नियमित गस्त व विशेष दक्षता याद्वारे निरीक्षण व माहिती संकलन करणे, संघर्षप्रवण गावांमध्ये सूचना फलक लावणे, लहान मुले, वृद्ध व महिलांच्या सुरक्षिततेबाबत विशेष सूचना देणे, जनजागृती व स्थानिक सहभाग वाढविण्यावर भर, ग्रामस्थांना सुरक्षित वर्तन, काळजी व प्रतिबंधात्मक उपायांबाबतचा सविस्तर आढावा त्यांनी यावेळी घेतला. सन-2007 मधील महत्वाच्या तरतूदीनुसार मानव वन्यजीव संघर्षामुळे उद्भवणाऱ्या मानवी मृत्यू, गंभीर दुखापत, घरांचे नुकसान तसेच पिकांचे नुकसान या बाबींसाठी तात्काळ पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याबाबत निर्देश देण्यात आले. तसेच मानव वन्यजीव संघर्ष प्रवणक्षेत्रामध्ये तातडीची कार्यवाही करण्यासाठी जलद प्रतिसाद पथके (आरआरटी) स्थापन करुन त्यासाठी आवश्यक साहित्याच्या मागणीकरिता तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीला विविध तालुक्यातील वनक्षेत्रपाल तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000000

Comments
Post a Comment