उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध विभागांना सतर्कतेच्या सूचना
रायगड-अलिबाग, दि.13 (जिमाका): राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) तसेच हवामान बदल आणि मानवी आरोग्यावरील राष्ट्रीय कार्यक्रम (NPCCHH) यांच्या सूचनांनुसार नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे.
उष्णतेच्या लाटेचा परिणाम कमी करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, आरोग्य, पंचायत, शिक्षण, कामगार, परिवहन, कृषी, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, महिला व बालविकास, MIDC तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या विभागांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी सावली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ORS सुविधा, शीतपेय केंद्रे, प्रथमोपचार किट, तसेच जनजागृती फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आरोग्य विभागामार्फत उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी स्वतंत्र वैद्यकीय सुविधा, जलद प्रतिसाद पथके (RRT), PHC स्तरावर ORS व आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळा-महाविद्यालयांमध्ये दुपारच्या वेळेत मैदानी उपक्रम टाळणे, विद्यार्थ्यांना पुरेसे पाणी व सावलीची सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच उष्णतेबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला आहे.
कामगार विभागाने कामाच्या वेळांमध्ये आवश्यक बदल करून कामगारांना सावली व थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तर परिवहन विभागाने बसस्थानके, रेल्वे स्थानके आदी ठिकाणी पाणी व ORS सुविधा ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानविषयक सूचना वेळोवेळी देऊन पीक संरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्याचे निर्देश दिले आहेत.
महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांद्वारे जनजागृती मोहीम राबविणे, गर्भवती महिला, लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी नागरिक यांच्याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलीस विभागाने सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देताना पिण्याच्या पाण्याची आणि सावलीची पुरेशी व्यवस्था असल्याची खात्री करण्यास सांगितले आहे.
नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी भरपूर पाणी पिणे, ORS, लिंबूपाणी, ताक यांसारख्या द्रव पदार्थांचे सेवन करणे, हलक्या रंगाचे सैल कपडे वापरणे, दुपारी 12 ते 3 या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळणे, थेट सूर्यप्रकाशापासून बचाव करणे आणि वृद्ध, लहान मुले तसेच आजारी व्यक्तींची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
000000
Comments
Post a Comment