सण उत्सव काळात शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 29 ऑगस्ट  2016                                                   वृत्त क्र. 555
सण उत्सव काळात शासकीय
यंत्रणांनी समन्वयाने काम करावे
-जिल्हाधिकारी  शीतल तेली-उगले


अलिबाग, दि.29 :- आगामी सण उत्सव तसेच गणेशोत्सव काळात जिल्ह्यात सर्वत्र शांतता राहून कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी महसूल, पोलीस  व इतर शासकीय विभागांनी समन्वयाने काम करुन जिल्हयातील  सर्व सण उत्सव सुरळीत पार पडतील याची दक्षता घ्यावी असे, आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आज जिल्ह्यातील सर्व महसूल, पोलीस व इतर शासकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. जिल्हा पोलीस अधिक्षक मो.सुवेझ हक, अपर पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र दंडाळे, उपविभागीय अधिकारी सर्वश्री भरत शितोळे, दत्ता भडकवाड,  सर्जेराव सोनावणे, तेजस समेळ, विश्वनाथ वेटकोळी, श्रीमती प्रेमलता जैतू, सुषमा सातपुते तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
सर्व यंत्रणेने एकत्रितपणे समन्वयाने काम केल्यास अपेक्षित उद्दिष्ट सहज साध्य करता येते. यामुळे महसूल व पोलीस तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणेने उत्सव काळात एकत्रितपणे काम करावे. असे सांगून जिल्हाधिकारी पुढे  म्हणाल्या की,  महसूल व पोलीस  विभागाचे कार्य चांगले  झाल्यास कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल. या काळात ध्वनी प्रदुषण होऊ नये यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांनी आपल्या क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांना याबाबत सूचना द्याव्यात. तसेच  शांतता कमिटयांच्या बैठकांचे आयोजन करावे. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित एकमेकांच्या संपर्कात रहावे व आपापले मोबाईल बंद राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच यावेळी त्यांनी तडीपार प्रकरणांचाही आढावा त्यांनी घेतला.
                              वाहतूक सुरळीत होणे आवश्यक
             जिल्हयातील रस्त्यांची दुरुस्ती तांतडीने हाती घेऊन गणेशोत्सवापूर्वी रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत होतील याची काळजी घ्यावी.  एस.टी.महामंडळाने एस.टी.बसेसचे योग्य नियोजन करावे. या कालावधीत वीज पुरवठा अखंडीत राहील याची खबरदारी घ्यावी, आवश्यक ठिकाणी तात्काळ दुरुस्तीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.  महत्वाच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी बॅरिकेट लावून वाहतुकीचे नियमन करावे असेही त्यांनी सांगितले.
पोलीस अधिक्षक मो.सुवेझ हक
सर्व पोलीस यंत्रणेने आपापल्या हद्दित कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील तसेच उत्सव शांततेत पार पडेल यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी महत्वाच्या ठिकाणी नादुरुस्त वाहन रस्त्याच्या बाजूला नेण्यासाठी क्रेन उपलब्ध करुन ठेवावेत. राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी . ठिकठिकाणी वाहतुकीचे दिशा दर्शक फलक लावावेत. महत्वाच्या ठिकाणी मदत केंद्रेही सुरु करावीत. पोलीस, महसूल यंत्रणेकडे असलेल्या विविध कायदा व


 सुव्यवस्थेसंदर्भात असलेल्या बाबींमध्ये उत्कृष्ट काम होणे अपेक्षित आहे. ज्यायोगे तडीपार व त्या सारख्या इतर प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये अडचण भासणार नाही. तसेच कुठल्याही कार्यवाहीचे नियोजन करताना दोन्ही विभागांनी एकत्र बसून नियोजन करावे. महसूल विभागाला त्यांच्या कार्यवाहीसाठी पोलीस विभागाचे संपूर्ण सहकार्य देण्यात येईल. गणेश विसर्जनाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी. पोलीस विभागामार्फत उत्कृष्ट मंडळाला पारितोषिक देण्यात येते . याबाबतची माहिती सर्व गणेशोत्सव मंडळांपर्यंत पोहोचवावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तर लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढयात स्वराज्य हा माझा जन्म सिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा नारा दिला. यास 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शासनाने गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत जिल्हयातील गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घ्यावा.त्यासाठी मंडळांनी  नोंद करावी. असे निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी यावेळी सांगितले.
राज्य परिवहन मंडळाचे विभाग नियंत्रक श्री. गिते यांनी गणेशोत्सव काळात एस.टी.मार्फत गेल्या वर्षीपेक्षा अधिक बसेस सोडण्यात येणार आहेत. रस्त्यात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून एस.टी.थांबण्यासाठी योग्य अशी ठिकाणे निवडण्यात आली आहेत.अशी माहिती दिली. यावेळी परिवहन अधिकारी , आनंद पाटील, पेणचे राजेंद्र मदने, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम महाड व्ही.आर.सातपुते, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ई.ए.मुलानी,  यांनीही चर्चेत सहभाग घेऊन उपयुक्त माहिती दिली. तसेच वाहतूक पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे, यांनी वाहतूक नियोजनाचे आणि पर्यायी मार्गाचे सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली.
या बैठकीला जिल्हयातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  
0000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन