गाव विकासात विविध कार्यकारी संस्थांचे योगदान वाढविण्यासाठी प्रयत्न-ना.सुभाष देशमुख


                   अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23- शेतकऱ्याच्या दृष्टीने आणि शेतमाल प्रक्रियेवर आधारीत उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी सद्यस्थितीत अडचणीत असलेल्या संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. त्यासाठी विविध कार्यकारी संस्थांचा कार्यविस्तार करुन ग्रामिण भागात समृद्धी आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना. सुभाष देशमुख यांनी आज येथे केले. 
 ना. देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सहकार व पणन विभागाची आढावा बैठक आज पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आ. सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, आ. प्रशांत ठाकूर,  उपजिल्हाधिकारी श्रीधर बोधे, जिल्हा उपनिबंधक पी.एम खोडका, जिल्हा विशेष लेखा परीक्षक यु.जी.तुपे, विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील आदी मान्यवर  तसेच सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
 यावेळी ना. देशमुख म्हणाले की, अटल महापणन विकास अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक खातेदार हा विविध कार्यकारी संस्थांशी जोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अनुदानातून नव्हे तर योगदानातून सहकारी संस्था उभ्या रहाव्यात यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. सध्या जिल्ह्यात 71 वि.का. सोसायट्यांची निवड या अभियानातून निवडण्यात आल्या असून त्यापैकी 40 संस्थांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केले आहे. 97 व्या घटनादुरुस्तीनुसार ज्या संस्थांना शासनाचा निधी मिळत नाही त्यांना स्वतःचे लेखापरीक्षक स्वतः नेमण्याचे अधिकार आहेत; अशा संस्थांपैकी 20 टक्के संस्थांचे दरवर्षी चाचणी लेखापरीक्षण करण्यात येईल, अशी माहितीही ना. देशमुख यांनी दिली. तसेच सहकार क्षेत्रासंदर्भातील नवनवीन योजना आणि कायदे याबद्दल जनजागृती करावी, असे निर्देशही अधिकाऱ्यांना त्यांनी दिले.
 जिल्ह्यातील बंद भात गिरण्या, ग्राहक संस्था आदींच्या पुनरुज्जीवनासाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही ना. देशमुख यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हा उपनिबंधक खोडका यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली की, जिल्ह्यात सर्व तालुक्यांत मिळून एकूण 4616 सहकारी संस्था आहेत.  त्यात सर्वाधिक 3167 गृहनिर्माण संस्था आहेत, 441 पतसंस्था , 303 हमाल व मजूर संस्था, 30 विविध कार्यकारी संस्था आहेत.  या शिवाय 12 खरेदी विक्री संघ,  9 बाजार समित्या, 35 फळे व भाजीपाला सोसायट्या, 24 भात गिरणी संस्था आदी संस्था आहेत.  त्यापैकी 3054 संस्थांचे लेखापरीक्षण पुर्ण झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत जिल्ह्यात 13 हजार 361 शेतकऱ्यांना  लाभ मिळाला असून पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात  24 कोटी 61 लाख 83 हजार 802 रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे.  या बैठकीनंतर ना. देशमुख यांनी पेण अर्बन बॅंकेचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन