अनधिकृत वाळु उत्खननःजिल्हाधिकाऱ्यांनी दिले संयुक्त कारवाईचे निर्देश



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22- जिल्ह्यात वाळूचे अनधिकृत उत्खनन रोखून वाळूमाफियांना पायबंद बसावा यासाठी महसूल प्रशासन कडक कारवाई करीत आहे. त्यासाठी मेरिटाईम बोर्ड, पोलीस, परिवहन विभाग आणि वन विभाग हे महसूल विभागासोबत या कारवाईत सहभागी होतील, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आज येथे दिले.
यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात (दि.20 रोजी) एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी भारत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उप वनसंरक्षक अलिबाग मनिष कुमार, प्रांत, तहसिलदार, पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्हा प्रशासनाने आता पर्यंत 13 कोटींचा वाळू लिलाव केला आहे. उर्वरित वाळूचा लिलाव करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये अनाधिकृत वाळू उत्खनन होणार नाही याकरीता जिल्हा प्रशासन दक्षता घेत आहे. अनाधिकृत वाळू उत्खनन करण्याऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. पकडलेले सक्शन पंप व बोटी नष्ट करण्यात येतील. ज्या बोटींवर नंबर नाहीत अशा बोटींवर कारवाई करण्यात येईल.या कारवाईसाठी मेरीटाईम बोर्डाकडून 10 ते 12 जणांचा ग्रुप तयार करुन नावाडी उपलब्ध करुन देण्यात याव्या, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. गेल्या वर्षी 3 कोटी पर्यंत लिलाव झाला होता  यंदा त्यातून 50 ते 60 कोटी रुपयांपर्यंत महसूल प्राप्त होऊ शकतो, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी भारत शितोळे यांनी यावेळी दिली.  महसूल, पोलीस, मेरीटाईम बोर्ड यांचे तपासणी पथक तयार करुन अवैध वाळू उत्खनन करण्याऱ्यांवर कारवाई करणार आहेत. यावर्षी 12 संक्शन पंप व 8 बोटी खाडीमध्ये नष्ट करण्यात आल्या. अलिबाग प्रांत, तहसिलदार, अपर जिल्हाधिकारी यांनी कारवाई केली. वन विभागाने कांडला येथील वाळू साठविण्याच्या कुंड्या नष्ट केल्या. अशा पद्धतीने वाळू माफियांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी यांनी यावेळी दिले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन