'पाण्याच्या पेरणी'साठी कापडे बु॥ येथे श्रमदान
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23- 'जे पेराल ते उगवेल',असे आपण नेहमी म्हणतो. हे
पाण्याच्या बाबतीतही तितकेच खरंआहे. भविष्यात पाणी वापरायला मिळावं त्यासाठी ते
पावसाच्या स्वरुपात पडतं तेव्हा ते पेरावं लागतं. म्हणजे मग नंतर आपल्याला जमिनीत
साठवलेल्या पाण्याचं पिक मिळतं. हा विचार कापडे बु॥ ता. पोलादपुर या ग्रामस्थांनी
केला. आणि पाणी पेरण्यासाठी म्हणून सगळ्यांनी श्रमदान करुन पाऊसरुपी पाण्याची
पेरणी करण्यासाठी सलग समतल चर खोदले. त्यांना पाठबळ देण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी
डॉ. विजय सूर्यवंशी सपत्निक उपस्थित होते. सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी,
कर्मचारी, उद्योगक्षेत्रातील कर्मचारी या ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा लावून
रविवारी (दि.22)श्रमदान करतांना दिसले.
पोलादपूर तालुक्यातील कापडे बु॥ हे गाव सध्या
पाणीटंचाईचा सामना करतंय. आणि हेच गाव पावसाळ्यात अतिवृष्टीचाही सामना करतं. या
दोन विषम परिस्थिती सांधण्यासाठी आज या गावाच्या शिवारात सलग समलत चर खोदण्यात आले. पाणी फाऊंडेशनच्या
वतीने आयोजित प्री वॉटरकप स्पर्धेत या गावाचा समावेश जिल्हाप्रशासनाच्या वतीने
करण्यात आला आहे. हे गाव ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानातही समाविष्ट आहे. या गावाचा सर्वांगिण विकास होण्याच्या दृष्टीने
तयार करण्यात आलेल्या गाव विकास आराखड्यात
जलसंधारण करणे याचाही समावेश असल्याने हे गाव या स्पर्धेसाठी जिल्हा
प्रशासनातर्फे आवर्जून निवडण्यात आले. पोलादपूर तालुक्यातील 14 गावांचा समावेश या
मृद जलसंधारण चळवळीसाठी करण्यात आला आहे.
सद्यस्थितीत
जिल्ह्यात पाणी फाऊंडेशनच्या प्री वॉटर कप स्पर्धेसाठी पोलादपुर तालुक्यातील
14 गावे निवडण्यात आली आहेत.
या
अभियानाचा भाग म्हणून हे श्रमदान करण्यात आलं. या श्रमदानासाठी जिल्हाधिकारी डॉ.
विजय सूर्यवंशी, आ. भरत गोगावले, महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, महाड
तहसिलदार चंद्रसेन पवार, पोलादपूरचे तहसिलदार शिवाजी जाधव, गटविकास अधिकारी डॉ.
भूषण जोशी, महाडचे गटविकास अधिकारी तडवी,
प्रभारी तालुका कृषि अधिकारी कैलास पवार,
ग्राम सामाजिक परिवर्तक रागिणी शेट्ये,
स्वदेश फाऊंडेशनचे तुषार इमामदार, जि.प. सदस्य चंद्रकात कळंबे, सुमन
कुंभार, पोलादपूर प।स. सभापती दीपिका दरेकर, उपसभापती शैलेश सलागरे, कापडे गावचे
सरपंच अजय सलागरे, प्रिव्ही ऑरगॅनिक्स, स्वदेश फाऊंडेशन तसेच अनेक नागरिक
स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते.
या
श्रमदानाचा शुभारंभ स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी नारळ वाढवून आणि कुदळ मारुन केला.
केवळ शुभारंभ करुन ते थांबले नाहीत तर स्वतः तो खड्डा खणून पूर्ण ही केला.
त्यांच्या साथीला होत्या त्यांच्या सुविद्य पत्नी. त्यांनीही त्यांना समर्थ साथ
दिली आणि तो खड्डा पूर्ण झाला. त्याच्या मापात म्हणजे 15 फुट लांब, 2 फुट रुंद,दीड
फुट खोल. त्याच्या शेजारचा खड्डा प्रांतसाहेब खणत होते. त्याच्या पलिकडे तहसिलदार
साहेब. असे तब्बल 127 खड्डे कुणीना कुणी खणत होते. सकाळी साडेसात ते साडेनऊ या
वेळात तब्बल 127 खड्डे खणून झाले देखिल.
खड्डा खणून डोंगराच्या उताराला त्यातील माती बांध म्हणून लावायची. याच मातीला
जवळपास पडलेल्या दगडगोट्यांचे पिचिंग करायचे. येत्या पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाची
पेरणी करण्यासाठी ही झाली कापडे॥ गावाची सज्जता. याच प्रमाणे पोलादपूर तालुक्यात 14 गावांमध्ये
ही कामे सुरु आहेत. स्वतः जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांच्या श्रमदानामुळे
ग्रामस्थांचा उत्साह दुणावला. आ. भरत गोगावले यांनीही आपली उपस्थिती लावून श्रमदानात
योगदान दिले.

Comments
Post a Comment