अखाद्य बर्फ निळा रंग टाकणे बंधनकारक
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5- खाद्य आणि अखाद्य बर्फ ओळखता यावा यासाठी अखाद्य
बर्फ उत्पादकांना आता अखाद्य बर्फ तयार करतांना त्यात निळा खाद्यरंग टाकावा व
खाद्य बर्फात कोणताही रंग टाकू नये असे आदेश
अन्न सुरक्षा आयुक्त मुंबई यांनी निर्गमित केले आहेत. तसेच खाद्य बर्फाचे उत्पादन
करणाऱ्या उत्पादकांना अन्न सुरक्षा व मानके नियमन (परवाना व नोंदणी) 2011 अंतर्गत
परवाना घेणे व नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या संदर्भात
सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन पेण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या
पत्रकात म्हटले आहे की, अन्न व्यावसायिकांकडून ग्राहकांना अन्न् पदार्थ विक्री
करतांना त्यात वापरण्याचे बर्फ किंवा थेट पाण्यासाठी विक्री होत असलेला बर्फ
पिण्यायोग्य पाण्यापासून तयार केलेला नसल्याने त्याचे मानवी आरोग्यावर दुष्परीणाम
होत असतात ही बाब निदर्शनास आल्यामुळे खाद्य बर्फ व अखाद्य बर्फ ओळखता यावे,
याकरीता श्रीमती अन्न सुरक्षा आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दि. 31 मार्च रोजी
अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात बर्फाचे उत्पादन करतांना अखाद्य बर्फात निळा खाद्यरंग
टाकावा व खाद्य दर्जाच्या बर्फात कोणताही
रंग टाकू नये असे आदेश निर्गमित केले आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्व बर्फाचे उत्पादन
करणाऱ्या व्यावसायिकांनी, खाद्य दर्जाचा बर्फ हा अन्न् सुरक्षा व मानदे कायदा 2016
नुसार अन्न या परिभाषेत मोडत असल्याने सदर बर्फाचे उत्पादनाकरीता अन्न सुरक्षा व
मानके नियमन (परवाना व नोंदणी)2011 अंतर्गत परवाना घेणे अथवा नोंदणी करणे बंधनकारक
आहे. ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल
12 लाखा पेक्षा जास्त आहे, त्यांनी परवाना घेणे आवश्यक आहे व ज्या अन्न व्यावसायिकांची
वार्षिक उलाढाल 12लाखापेक्षा कमी आहे त्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. विना परवाना
व्यवसाय करणे गुन्हा असून कलम 63 नुसार 6 महिन्यापर्यंत शिक्षा व रु. 5 लाख दंड
होऊ शकतो.
तरी खाद्य दर्जाच्या बर्फाचे उत्पादन करणाऱ्या
व्यावसायिकांनी परवाना अथवा नोंदणी करुनच
बर्फाचे उत्पादन व विक्री करावी .खाद्य दर्जाचा बर्फात कोणताही रंग टाकू
नये व अखाद्य बर्फात खाद्यरंग अत्यल्प्
प्रमाणात निळसर रंगाची छटा निर्माण होईल एवढा (किमान )खाद्यरंग वापरावा.अखाद्य
बर्फाच्या उत्पादकांनी त्यामध्ये खाद्य रंगाचा वापर केला नाही तर सदरचा बर्फ खाद्य
बर्फ समजून त्यांच्या विरुद्ध अन्न् व सुरक्षा मानदे कायदा 2006 नुसार कारवाई करण्यात येईल.
व्यावसायिकांच्या सोईसाठी महाराष्ट्र शासनाने परवाना अथवा नोंदणीकरीता ऑनलाईन
सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यानुसार
www.foodlicensing.fssai.gov.in या संकेत स्थळावर परवाना किंवा नोंदणीकरीता योग्य त्या
कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत.तसेच परवाना
शुल्क, शुल्क भरल्याबाबतची प्रत अर्जासोबत www.gras mahakosh gov.in या
संकेतस्थळावर भरुन, शुल्क भरल्याची प्रत अर्जासोबत सादर करावी. अधिक माहितीसाठी
प्रशासनाचा टोल फ्रि क्रमांक 1800222365 अथवा 02143-252085 कार्यालयीन दुरध्वनी
क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न),अन्न व औषध प्रशासन , पेण दि.तु.संगत, यांनी केले
आहे.
०००००
Comments
Post a Comment