राज्य अनुसुचित जाती जमाती आयोग दौरा विकास योजनांच्या अंमलबजावणीचे काम समाधानकारक- अध्यक्ष विजय कांबळे
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)31- जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातींच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध
विकास योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम जिल्हा परिषद व अन्य शासकीय यंत्रणांकडून
समाधानकारक होत आहे. तथापि या विकास योजनांच्या
अंमलबजावणी नंतर या मागास घटकांच्या जीवनमानात झालेल्या बदलांचे मूल्यमापनही करावे
असे निर्देश राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी आज येथे
केले.
राज्य
अनुसूचित जाती जमाती आयोगाने आज रायगड जिल्ह्यास भेट देऊन अनुसूचित जाती जमातींच्या संदर्भात विविध बाबींचा आढावा घेतला.
जिल्हा परिषदेच्या टिपणीस सभागृहात ही आढावा बैठक पार पडली. यावेळी आयोगाचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी आढावा घेतला. यावेळी आयोगाचे अन्य सदस्य मधुकर गायकवाड तसेच संपर्क
अधिकारी रमेश शिंदे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद प्रशासनातार्फे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
प्रकाश खोपकर, तसेच महसूल प्रशासनातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे,
पोलीस प्रशासनातर्फे अपर पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील,उप मुख्य कार्यकारी
अधिकारी निखिल ओसवाल, साळुंखे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे संजय वेंगुर्लेकर,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, शिक्षणाधिकारी प्राथमिक शैलजा दराडे
यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण
विभागाचा विशेष उपक्रम असलेल्या कातकरी बोलीभाषा पुस्तिकेचे आयोगाने कौतूक
केले. त्यानंतर आयोगाने जिल्हा परिषद
आस्थापनांवरील अनुसूचित जाती जमातींची रिक्त पदे, त्यापदभरतीसाठीचे प्रयत्न,
पदोन्नती, बदल्यांमुळे रिक्त राहणारी पदे आदींबाबत आढावा घेतला. तसेच रिक्त पदे
भरण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने उपाययोजना कराव्या, अशी सुचनाही केली. यावेळी आयोगाने जिल्हा दक्षता समिती, अनुसूचित
जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल प्रकरणे आदींचा आढावा
घेतला. यावेळी आयोगाने सुचना केली की, गावागावात सामाजिक संघर्ष टाळण्यासाठी
प्रशासनाने कारणमिमांसा करुन उपाययोजना करावी. दाखल प्रकरणांमध्ये दोषींविरुद्ध सबळ पुरावे गोळा करण्यासाठी तपासी अंमलदारांना
प्रशिक्षित करावे.
आपल्या समारोपीय संबोधनात अध्यक्ष
कांबळे म्हणाले की, अधिकाऱ्यांनी अनुसूचित जाती जमातींच्या कल्याणासाठी राबविण्यात
येत असलेल्या योजनांच्या खर्चात योजनानिहाय प्रयोजनात पुनरावृत्ती होणार नाही याची
खबरदारी घ्यावी. तसेच निधी वेळेत खर्च होण्यासाठी नियोजन करावे, जेणे करुन योजनेचा
योग्य लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल.
बैठकीच्या शेवटी अति. मुख्य
कार्यकारी अधिकारी खोपकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
000000
Comments
Post a Comment