‘गुण गाईन आवडी’ ने रसिकांची जिंकली मने गदिमांच्या गितांमुळे अलिबागकरांची सायंकाळ ‘पुल’कित
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16- रायगड
जिल्हा ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या अंतिम
सत्रात महाराष्ट्राचे थोर
गीतकार ग. दि. माडगुळकर व साहित्यिक पु.
ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी
वर्षानिमित्त ‘गुण गाईन आवडी’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
अलिबाग शहरातील कलावंतांनी गदिमांची गिते आणि पु ल देशपांडे यांच्या ‘व्यक्ति आणि
वल्ली’तील पात्रांचे रंगमंचीय सादरीकरण करुन रसिकांची मने जिंकली आणि अलिबागकरांची
सायंकाळ ‘पुल’कित झाली.
महाराष्ट्र
शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मंबई व जिल्हा ग्रंथालय
अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग यांच्या विद्यमाने रायगड जिल्हा ग्रंथोत्सव – 2018
येथील जिल्हा सार्वजनिक वाचनालयाच्या डोंगर हॉल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्त पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात स्थानिक कलावंत विक्रांत वार्डे व
श्रीमती श्रृती बोंद्रे व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमामुळे
ग्रंथोत्सवाची पहिल्या दिवसाची सायंकाळ गदिमा आणि पुलंच्या स्मृतीसुगंधाने दरवळली.
गीतकार
ग.दि. माडगुळकर आणि साहित्यिक पु.ल.देशपांडे ही महाराष्ट्राची लाडकी व्यक्तिमत्व.
गदिमांच्या गितांनी महाराष्ट्रावर काव्य संस्कार झाले तर पु.ल देशपांडे यांच्या साहित्याने
महाराष्ट्राला निखळपणे हसवलं. या दोन्ही महान साहित्यिकांचं हे जन्मशताब्दी वर्ष. त्या
पार्श्वभूमिवर जिल्हा ग्रंथोत्सवात ‘गुण गाईन आवडी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले. यावेळी पुलंचे चितळे मास्तर, अंतू बर्वा, नारायण या पात्रांना
प्रत्यक्ष रंगमंचावर बघून रसिक हरखून गेले. शिवाय प्रत्यक्ष पुलं म्हणजे वाचकांचे
लाडके भाई आणि सुनिताबाई ही होत्या. या रंगमंचीय सादरीकरणाद्वारे स्वतः भाईंनी
गदिमा म्हणजे अण्णांसोबत असलेले स्नेहबंध उलगडतांना रसिकांसमोर त्यांच्या गीतलेखन
प्रवास उलगडला. गदिमांचा उल्लेख होतांना सुधीर फडके म्हणजेच बाबुजींचा उल्लेख
अपरिहार्यच होता. त्यामुळे बाबुजींच्या सुरावटींवर गदिमांच्या गीतांनी अलिबागकर
रसिकांची सायंकाळ पुल’कित’ झाली.
या
कार्यक्रमात विक्रांत वार्डे, प्रशांत म्हात्रे, जुईली
म्हात्रे, अमित नागे, लीना अभ्यंकर यांनी गीत सादर केले. त्यांना हार्मोनियमवर
पंडीत काका, तबल्यावर सुशांत वार्डे, अभय
आयरकर, साईड रिदमवर अक्षय म्हात्रे यांनी साथ संगत केली. तर पुलंच्या व्यक्तिरेखा
सादर करतांना संतोष बोंद्रे यांनी पु.ल.देशपांडे, प्रविण सरनाईक यांनी चितळे
मास्तर, श्रीराम जोशी यांनी नारायण,
नरेंद्र गोखले, कीर्ती साठे यांनी सुनिता देशपांडे यांच्या भूमिका साकारल्या.
श्रृती बोंद्रे यांनी या कार्यक्रमाचे संहिता लेखन केले.
०००००

Comments
Post a Comment