24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन



अलिबाग (जिमाका)दि.17:- 24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आला. त्या अनुषंगाने जिल्हयामध्ये 24 डिसेंबर,2019 हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून राज्य व जिल्हा स्तरावर साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड  पुरवठा विभागामार्फत, अलिबाग येथील अलिबाग राज्य परिवहन आगारातील (एसटी स्टँड) येथील मोकळया जागेमध्ये ग्राहक उपयोगी बाबीचे (विविध कार्यालयातील शासकीय योजना व नियमित ग्राहकोपयोगी बाबी) स्टॉल लावून विविध योजना व वस्तू बाबतची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने सदर कार्यक्रमाचे आयोजन सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत केले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 10.30 वाजता  रविंद्र नगरे,अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग जि. रायगड यांच्या शुभहस्ते होणार असून रायगड जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. तर दिलीप हळदे(भा.प्र.से), मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद रायगड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
यावर्षी रविवार दिनांक 22 डिसेंबर ते शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2019 हा सप्ताह ग्राहक जनजागृती सप्ताह म्हणून साजरा करण्याचे योजिले आहे. त्या निमित्ताने जनतेमध्ये वस्तू व सेवा खरेदी करतांना दर्जा तसेच वजनमापांमध्ये होणाऱ्या  फसवणूकी पासून सावधानता बाळगळण्या बाबत संदेश, ग्राहक म्हणून प्राप्त असणाऱ्या  हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी तसेच ग्राहकांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य इ. बाबत ग्राहकांमध्ये जागरुकता यावी  यासाठी त्या प्रकारचे संदेश व माहिती लोककला व पथनाट्य इ. माध्यमांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचे प्रयोजन आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये 7 ठिकाणी पथनाट्यद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
तरी सर्व नागरिकांनी व ग्राहकांनी  मंगळवार दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.00 या वेळेत शासनाच्या विविध ग्राहक  उपयोगी वस्तू, सेवा व योजना याबाबतच्या माहितीचे  विविध विभागाचे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. याचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांनी केले आहे.
000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन