‘करोना’ च्या विरोधात ‘रक्तदान करा ना’ चे आवाहन यशस्वी महाड, पोलादपूर, माणगाव मधील 125 ते 150 शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दिनांक :- 09/04/2020
दिवस रविवार, दि.5 एप्रिल 2020, स्थळ- महाड
येथील जनकल्याण रक्तपेढी..सकाळपासूनच येथे शिक्षक परिषदेच्या शिक्षक
कार्यकर्त्यांची लगबग सुरु होती. मात्र ही
लगबग नेहमीच्या उत्साहपूर्ण अशा कार्यक्रमाबाबत नक्कीच नव्हती. ही लगबग होती ती… महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद,
प्राथमिक विभाग, जिल्हा शाखा रायगडने ‘करोना’ च्या विरोधात ‘रक्तदान करा ना’ च्या
केलेल्या आवाहनाने संपन्न होणाऱ्या रक्तदान शिबिराच्या प्रतिसादासाठी…!
“राष्ट्रहितासाठी
शिक्षणहित,शिक्षण हितासाठी शिक्षकहित,समाज हितासाठी शिक्षकहित !” शिक्षक परिषदेच्या या ब्रीद वाक्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य शिक्षक
परिषद, प्राथमिक विभाग, जिल्हा शाखा रायगडने ‘करोना’ च्या विरोधात ‘रक्तदान करा ना’ असे
आवाहन त्यांच्या शिक्षक सभासदांना केले होते.
सध्या जगात करोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढल्याने
चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे भारत व महाराष्ट्र शासनाच्या वतीनेही खंबीरपणे
करोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या जात आहेत. या उपाययोजना यशस्वीपणे
राबविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकही शासनास
सहकार्य करीत आहे. काळाची गरज ओळखून भविष्याचा विचार करुन रक्त संकलन मोठ्या प्रमाणावर
होण्यासाठी राज्यभर प्रयत्न सुरु झाले आहेत. समाजातील निरोगी,सशक्त लोकांनी रक्तदान करावे,
यासाठी आवाहन करण्यात आले.
आरोग्य
मंत्री राजेश टोपे यांनीही समस्त महाराष्ट्राला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.
त्याला अनुसरून शिक्षक संघटनेचे संस्थापक आमदार
श्री. संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र
राज्य शिक्षक परिषद, प्राथमिक विभाग, राज्य अध्यक्ष श्री.सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली
रायगड जिल्हा शिक्षक परिषद, प्राथमिक विभागाच्या वतीने हे रक्तदान शिबीर आयोजित
करण्यात आले होते. त्यानुसार महाड, पोलादपूर
व माणगाव तालुक्यातून शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात
प्रतिसाद मिळाला.
रविवार, दि.5 एप्रिल, मंगळवार,दि. 7 एप्रिल व बुधवार, दि.8 एप्रिल 2020 रोजी सकाळी 10.00 ते
दुपारी 1.00 व दुपारी 2.00 ते 5.00 या वेळेमध्ये जनकल्याण रक्तपेढी, महाड येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. आणि बघता बघता ‘करोना’ च्या विरोधात ‘रक्तदान करा ना’ या आवाहनाला उत्स्फूर्त
प्रतिसाद देत महाड, पोलादपूर व माणगाव तालुक्यातील तब्बल 125 ते 150 शिक्षकांनी रक्तदान
केले. अर्थातच हे सर्व नियोजन स्वच्छता बाळगणे,मास्क घालणे,सॅनिटायजरचा वापर करणे,
सोशल डिस्टंसिंग पाळणे या गोष्टींचे काटेकोर पालन करुनच पार पडले.
रक्तदान शिबिरातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी
महाड तालुका पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री.अॅड.प्रमोद गोडांबे व गटशिक्षणाधिकारी
सौ. सुनिता चांदोरकर हे मान्यवर उपस्थित होते.
या मान्यवरांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्रही देण्यात
आले.
यावेळी कोंडमालुसरे,ता.महाड या शाळेच्या श्री.व
सौ. अनिल नळगे या प्राथमिक शिक्षक दाम्पत्यांनी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना केळी
व गूळ-शेंगदाणे लाडू दिले .
जिल्हा कार्यवाह विजय पवार, तालुका अध्यक्ष
मनोज सकपाळ,भिकाजी मांढरे, सर्वश्री वैभव कांबळे,
प्रशांत तुळसकर, सचिन खोपडे, बाळासाहेब बारगजे,
दिपक साळवी, कोंडविलकर, समीर होडबे, बालाजी गुबनरे, रविंद्र पाटील, गुलाब चेडे, पूजा शहा, दिप्ती गावंड, सौ. वैशाली सस्ते, सौ. स्मिता नवघरे, संघटनेच्या जिल्हा, तालुका पदाधिकारी
यांनी जी मेहनत घेतली, त्याचे कौतुक करावे
तितके कमीच…!
‘करोना’ च्या विरोधात ‘रक्तदान करा ना’
हे आवाहन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, प्राथमिक विभाग, जिल्हा शाखा रायगडच्या
सर्व शिक्षकांना आणि या आवाहनाला
उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या सर्व शिक्षक रक्तदात्यांना आपल्या सर्वांचा मानाचा
मुजरा..!
(मनोज शिवाजी सानप)
जिल्हा
माहिती अधिकारी
रायगड-अलिबाग
00000

Comments
Post a Comment