मुरुड-जंजिराला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याविषयीचा शासन निर्णय जारी पालकमंत्री आदिती तटकरेंचे जिल्ह्याच्या पर्यटनवाढीच्या दृष्टीने उल्लेखनीय यश
अलिबाग,जि.रायगड,दि.24
(जिमाका) : जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा या शहराला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा
देण्यात येत असल्याची घोषणा काही दिवसांपूवी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी
केली होती. मुरुड-जंजिरा या शहराला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात यावा,
यासाठी पर्यटन राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी
पुढाकार घेतला होता.
मुंबई, पुण्यापासून जवळ असलेल्या रायगड
जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासास चालना देण्याच्या दृष्टीने नुकताच
मुरुड-जंजिरा या शहरास 'ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याबाबतचा शासन निर्णय
जारी करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील “मुरुड-जंजिरा” या
पर्यटनस्थळाची भौगोलिक स्थिती आकर्षित करणारी आहे. शहरात प्रवेश करतानाच नबाबी
नजाकतीचा राजवाडा दृष्टीस पडल्यानंतर पुढे अथांग अरबी समुद्र व याच सागरात घट्ट
पाय रोवून उभा असलेला इतिहासाचा मुख्य साक्षीदार पद्मदूर्ग" तसेच विलोभनीय
मुरुड समुद्र किनारा नजरेस पडतो, त्यानंतरच शहराचे वेशीवर दर्शन होते ते श्री
कोटेश्वरी ग्रामदेवतेचे. तसेच शहराचे
मध्यवर्ती ठिकाणी श्रीभोगेश्वर मंदिर तसेच श्री लक्ष्मीनारायण व इतर पुरातन मंदिरे
आहेत. त्याचप्रमाणे मुरुड शहरात सन 1750 च्या सुमारास निसर्गरम्य टेकडीच्या
माध्यावरील सपाट मैदानावर बांधण्यात आलेले ऐतिहासिक श्री दत्तमंदिर आहे. तसेच
त्याच टेकडीवर मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान अत्यंत सुंदर वास्तू म्हणजे इदगाह
येथून शहराचे विहंगम दृष्य दिसते. शहरापासून एकदरा गावानजीक खोराबंदर आहे. तेथूनही
जंजिरा किल्ला समोरच दिसतो.
मुरुङ-जंजिरा" या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी
जंजिरा हा ऐतिहासिक जलदुर्ग असल्याने या किल्ल्यास आवर्जून भेट देण्यासाठी
साधारणपणे माहे, ऑक्टोबर ते मे महिन्यांत फ्रान्स, जर्मनी, इंग्लड, पॅरीस,
ऑस्ट्रेलिया व इतर देशामधून विदेशी पर्यटक येतात. हा जलदूर्ग तसेच मुरुड बीचवर
दरवर्षी सुमारे 5 ते 6 लक्ष पर्यटक भेट देतात. मुरुड तालुक्यातील काशिद बीच,
नांदगाव गणपती मंदिर, मुरुड बीच, जंजिरा किल्ला व सिध्दीनबाब राजवाडा या ठिकाणी
आलेला प्रत्येक पर्यटक हा मुरुड शहराला भेट देतो.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे
यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या प्रस्तावान्वये "मुरुड-जंजिरा,
या शहरास 'ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची शिफारस करण्यात आली होती. मुरुड-जंजिराला
दरवर्षी अंदाजे 8 ते 10 लक्ष पर्यटक भेट देतात. या पर्यटनस्थळाचे राज्यस्तरीय महत्व,
या पर्यटनस्थळास भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या, ऐतिहासिक व भौगोलिक महत्त्व इत्यादी
बाबी विचारात घेता, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि.25 एप्रिल 2017 च्या शासन
निर्णयानुसार राज्यातील 'ब' वर्ग पर्यटनस्थळे घोषित करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या
निकष व कार्यपध्दती नुसार “मुरुड-जंजिरा या पर्यटनस्थळास 'ब' वर्ग पर्यटनस्थळ
म्हणून घोषित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
या पार्श्वभूमीवर शासनामार्फत येथे विविध पर्यटन सुविधा, पायाभूत सुविधांचा
विकास करण्यात येईल. यामुळे येथील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा
विश्वास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
०००००००
Comments
Post a Comment