श्रीवर्धनला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याविषयीचा शासन निर्णय जारी पालकमंत्री आदिती तटकरेंचे जिल्ह्याच्या पर्यटनवाढीच्या दृष्टीने मोठे यश
अलिबाग,जि.रायगड,दि.24
(जिमाका) : जिल्ह्यातील श्रीवर्धन या शहराला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात
येत असल्याची घोषणा काही दिवसांपूवी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती.
श्रीवर्धन या शहराला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात यावा, यासाठी पर्यटन
राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी पुढाकार घेतला
होता.
मुंबई, पुण्यापासून जवळ असलेल्या रायगड
जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासास चालना देण्याच्या दृष्टीने नुकताच श्रीवर्धन
या शहरास 'ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात
आला आहे.
रायगड जिल्ह्यातील
"श्रीवर्धन" हे पर्यटनस्थळ मुरुड जंजिरा किल्ल्याच्या दक्षिणेस सुमारे 20
कि.मी. अंतरावर तर दक्षिण काशी' म्हणून ओळखल्या जाणार्या श्रीक्षेत्र हरिहरेश्वरच्या
उत्तरेस सुमारे 4.80कि.मी. अंतरावर अरबी समुद्र किनारी स्थित आहे. या पर्यटनस्थळाच्या
ठिकाणी व परिसरामध्ये असलेली प्राचीन मंदिरे, श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, दिवे आगार व
इतर आसपासच्या क्षेत्रातील धार्मिक स्थळे आणि विस्तीर्ण समुद्र किनारा यामुळे श्रीवर्धन
या पर्यटनस्थळास मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात.
श्रीवर्धन" हे
पर्यटनस्थळ अरबी समुद्र किनारी प्राचीन काळापासून वसलेले शहर आहे. या शहरास सुमारे
4 कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. या पर्यटनस्थळाच्या उत्तरेस तांबडी डोंगर,
एका बाजूस समुद्र आणि दुसऱ्या बाजूस उंच डोंगर तसेच लगतची पूर्वेकडील काळींजे खाडी
यामुळे श्रीवर्धन येथील हवामान कायमच शीत स्वरुपाचे असते.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे
यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या प्रस्तावान्वये “श्रीवर्धन” या शहरास 'ब' वर्ग पर्यटनस्थळाचा
दर्जा देण्याची शिफारस करण्यात आली होती. श्रीवर्धन शहर, येथील समुद्र किनाऱ्यास दरवर्षी
अंदाजे 5 लक्ष पर्यटक भेट देतात. या पर्यटनस्थळाचे राज्यस्तरीय महत्व, या पर्यटनस्थळास
भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या, ऐतिहासिक व भौगोलिक महत्त्व इत्यादी बाबी विचारात
घेता, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि.25 एप्रिल 2017 च्या शासन निर्णयानुसार
राज्यातील 'ब' वर्ग पर्यटनस्थळे घोषित करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या निकष व कार्यपध्दती
नुसार “श्रीवर्धन” या पर्यटनस्थळास 'ब' वर्ग पर्यटनस्थळ म्हणून घोषित
करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
या पार्श्वभूमीवर शासनामार्फत येथे विविध पर्यटन सुविधा, पायाभूत सुविधांचा
विकास करण्यात येईल. यामुळे येथील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा
विश्वास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
०००००००
Comments
Post a Comment