पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेंतर्गत रोपवाटिका उभारणी योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
अलिबाग, दि.12 (जिमाका):- जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दर्जेदार किड व रोगमुक्त रोपे तयार करणाऱ्या लहान रोपवाटिका उभारण्यास असलेला वाव पाहता या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना नव्याने सुरु करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सन 2020-21 या आर्थिक वर्षांमध्ये 15 तालुक्यांमध्ये एकूण 17 शेतकऱ्यांच्या भाजीपाला रोपवाटिकेची उभारणी झाली आहे. त्यापैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 15 व अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 2 रोपवाटिका उभारण्यात आल्या आहेत. हवामान बदलाचा विचार करता भविष्यात तयार रोपे, कलमे यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
या पार्श्वभूमीवर इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे अर्ज करावेत व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर असून राज्यात मोठया प्रमाणात फळे व भाजीपाला पिकाचे व्यावसायीक पध्दतीने लागवड करून उत्पादन घेतले जाते. तसेच त्याचे निर्यातही मोठया प्रमाणात करण्यात येते. मागील 2 ते 3 वर्षांमध्ये भाजीपाला पिकांचे निर्यातक्षम व विषमुक्त उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे भाजीपाला विषाणांच्या चांगल्या जातो व चांगली रोपे यांची मागणी वाढत आहे. त्यादृष्टीने नियंत्रित वातावरणामध्ये मयार झालेली किड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठया प्रमाणावर वाढत आहे.
रोपवाटिकेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे व पिक रचनेत बदल घडवून आणणे तसेच नविन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यास किमान 1 रोपवाटिका उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. यासाठी लाभार्थी निवड करताना लाभार्थीकडे स्वतःच्या मालकीची किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. (7/12) व रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे. योजनेच्या लाभासाठी प्रथम महिला कृषी पदवीधारक, द्वितीय महिला गट, महिला शेतकऱ्यांना तर इतर तृतीय प्राधान्य भाजीपाला उत्पादक गट, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, शेतकरी गट यांना आहे. शासनाच्या लाभ घेतलेल्या व खाजगी रोपवाटिकाधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेकरिता रु.4.60 लाख खर्च मर्यादा असून त्यासाठी 50 टक्के अनुदान रक्कम रु.2.30 लाख अनुदान लाभार्थ्यास देय आहे.
तरी इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे अर्ज करावेत व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे.
00000

Comments
Post a Comment