फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1) प्रमाणे मनाई आदेश जारी

 


 

अलिबाग,दि.14(जिमाका) :- ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम मा. राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केल्यामुळे दि.09 नोव्हेंबर 2022 रोजीपासून आचारसंहिता अंमलात आली असून दि.18 डिसेंबर 2022 रोजी मतदान व दि.20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत, परिमंडळ 2 मधील पनवेल तहसिल विभागातील पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंध्रण, भाताण, कानपोली, केळवणे, नेरे, दिघाटी, पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत शिरढोण, शिवकर, करंजाडे, तळोजा पोलीस ठाणे हद्दीत नितळस ग्रामपंचायत तसेच उरण तहसिल विभागातील उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राणसई, पुनाडे, सारडे, नवीन शेवा, धुतुम, कळंबुसरे, बोकडविरा, वशेणी, पागोटे, पिरकोन, चिर्ले, भेंडखळ, नवघर, न्हावाशेवा पोलीस ठाणे हद्दीत पाणजे, डोंगरी, करळ, जसखार, मोरासागरी पोलीस ठाणेच्या हद्दीत घारापुरी हद्दीत राजकीय स्पर्धेपोटी वादविवाद होवून निवडणुकीच्या कालावधीत दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याने आगामी ग्रामपंचायत निवडणूकीच्या दरम्यान प्रचारात चुरस निर्माण होण्याची शक्यता असून स्थानिक, राजकीय कार्यकर्त्यांमध्ये आपसात भांडण,  तंटे होवून गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रसंगी एखाद्या गटाकडून, व्यक्तीकडून हत्याराचा दुरुपयोग होवून, गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच मतदान व मतमोजणीच्या दिवशी शस्त्राच्या सहाय्याने कोणी मतदारांना धाकदपटशा दाखवून नये, किंवा हत्याराचा दुरुपयोग करु नये, याकरिता सहा.पोलीस आयुक्त, अतिरिक्त कार्यभार पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई राहुल गायकवाड यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1) अन्वये नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ 2 मधील पनवेल तालुका, पनवेल शहर, तळोजा, उरण, न्हावाशेवा, मोरासागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात शस्त्र परवानाधारकांना शस्त्रात्रे घेवून फिरण्यासाठी मनाई आदेश जारी केला आहे.

 जे इसम शासकीय नोकरीत आहेत व त्यांना वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्याचे निमित्ताने शस्त्र बाळगणे, नेणे भाग आहे अथवा ज्यांना किंवा तत्सम अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांनी सूट दिली आहे किंवा इतर कोणताही शस्त्र परवानाधारक इसम ज्याने सूट घेतली आहे त्यांना हे आदेश लागू राहणार नाहीत.

हा आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ -2 मधील पनवेल तालुका, पनवेल शहर, तळोजा, उरण, न्हावाशेवा व मोरासागरी पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्रात दि.09 नोव्हेंबर 2022 चे 00.01 वा. पासून ते दि. 25 डिसेंबर 2022 चे 24.00 वा. पर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शस्त्र परवानाधारकांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, सहा.पोलीस आयुक्त, अतिरिक्त कार्यभार पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई राहुल गायकवाड असे यांनी कळविले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन