स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना


 

स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2022-23 मध्ये राबविण्यास दि.4 ऑक्टोबर 2022 च्या शासन निर्णयानुसार पुन्हा मान्यता देण्यात आली आहे. काय आहे ही योजना जाणू घेवू या लेखातून…

योजनेचे मुख्य उद्दिष्ट- पिक व पशुधन याबरोबर फळबागेच्या रुपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादनाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लागवडीचा लाभ देण्यास अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यास लाभ देण्यासाठी.

लागवडीसाठी अनुज्ञेय फळपिके : कलमे-आंबा, काजू, पेरु, सीताफळ, आवळा, चिंच , जांभूळ, कोकम, फणस, चिकू, कागदी लिंबू.  रोपे- नारळ बाणावली, टि/डी.

क्षेत्र मर्यादा- कोकणाकरिता कमाल 10 हेक्टर उर्वरित महाराष्ट्र 6 हेक्टर (रोजगार हमी योजना/महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत यापूर्वी लाभ घेतलेल्या क्षेत्रासह)

लाभार्थी निकष- वैयक्तिक शेतकरी, ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत लागवडीचा लाभ देण्यास अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यास लाभ देणे, स्वतःच्या नावे 7/12 व संयुक्त खातेदार असल्यास संमतीपत्र आवश्यक, कुळाच्या नावे असल्यास कुळाचे संमतीपत्र आवश्यक, परंपरागत वन निवासी अधिनियम 2006 नुसार वनपट्टेधारक शेतकरी, किमान 10 गुंठे जमीन आवश्यक, अल्प/अत्यल्प, महिला, दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य.

यामध्ये शेतकऱ्याने स्वखर्चाने-जमीन तयार करणे, शासन अनुदानित-खड्डे खोदणे, शेतकऱ्याने स्वखर्चाने-माती व शेणखत/सेंद्रिय खत मिश्रणाने खड्डे भरणे, शासन अनुदानित-कलमे लागवड करणे (नारळाच्या बाबतीत रोपे), शेतकऱ्याने स्वखर्चाने- रासायनिक खत वापरुन खड्डे भरणे, शासन अनुदानित-पीक संरक्षण, शेतकऱ्याने स्वखर्चाने- आंतर मशागत करणे, शासन अनुदानित-नांग्या भरणे, शेतकऱ्याने स्वखर्चाने- काटेरी झाडांचे कुंपण (ऐच्छिक), शासन अनुदानित- ठिंबक सिंचनाद्वारे पाणी देणे, या बाबी समाविष्ट आहेत.

ठिबक सिंचन संच उभारणीकरिता 100 टक्के अनुदान. केंद्र पुरस्कृत ठिबक सिंचन योजनेतून अनुज्ञेय असणारे अनुदान प्रथमतः अदा करून उर्वरीत अनुदान या योजनेतून देय.

अंतर्गत अर्थसहाय्य- अनुदानाचे वाटप 50:30:20 याप्रमाणे 3 वर्षात फळांच्या जिवंत टक्केवारीनुसार देय. प्रथम वर्ष 80

टक्के, दुसरे वर्ष 90 टक्के झाडे जिवंत असावीत. आवश्यक कलमे/रोपे शासकीय/ कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतून परमिट व्दारे घेतल्यास कलमा/ रोपाचे अनुदान थेट रोपवाटिकास बँकेव्दारे वर्ग करावे. उर्वरीत अनुदान शेतकऱ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग करावे.

अर्ज करावयाची कार्यपध्दती : स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करुन शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात यावेत. जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून पुढील 21 दिवसांच्या आत अर्ज स्विकारण्यात यावेत.  जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पद्धतीने निवड करण्यात यावी व निवड केलेल्या लागवडीबाबत त्वरित पूर्वसंमती देण्यात यावी. 

स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या लाभासाठी  http://mahadbt.gov.in  या संकेतस्थळावरुन शेतकरी योजना पर्याय निवडून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. तसेच ठिबक सिंचनाच्या लाभासाठी त्याच संकेतस्थळावर वेगळा अर्ज करावा.

सादर करावयाची कागदपत्रे : विहीत नमुन्यातील अर्ज,  7/12 व 8 अ उतारा, करार पत्रक प्रपत्र/हमीपत्र, संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र परिशिष्ट-1, आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत (फोटोसहीत), आधार कार्ड छायांकित प्रत,जातीचा दाखला (अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी).

कलमे रोपांची निवड लाभार्थीने स्वतः करावयाची आहे.  त्यासाठी कलमे/रोपे खरेदी करताना रोपवाटिकांचा प्राधान्यक्रम असा राहील- कृषी विभागाच्या रोपवाटिका, कृषी विद्यापिठांच्या रोपवाटिका, राष्ट्रीय बागवानी मंडळामार्फत मानांकित पंजीकृत खाजगी रोपवाटिका, परवानाधारक खाजगी रोपवाटिका.

योजनेंतर्गत इतर तरतुदी :-

v  फळबाग लागवडीचा कालावधी माहे जून ते मार्च अखेरपर्यंत राहील.

v  कोकण विभागास 10  हेक्टर क्षेत्रापर्यंत लागवड करण्यास मान्यता असून ठिंबक सिंचन या घटकास 100 टक्के अनुदान देय करण्यात आले आहे. त्यामुळे 5 हेक्टर क्षेत्रापर्यंतच्या लाभार्थीस प्रथमतः प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अनुज्ञेय  

            अनुदान देय करण्यात यावे व उर्वरीत अनुदान भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून देण्यास मान्यता.

v  महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत सन 2010 पासून पुढे लागवड केलेल्या फळबाग लागवडीचे क्षेत्र वगळून लाभार्थ्यास उर्वरीत अनुज्ञेय क्षेत्रापर्यंत (एकूण 10 हे.) या योजनेमध्ये लाभ देण्यास मान्यता.

v  1 हेक्टर पेक्षा कमी व त्यापेक्षा जास्त क्षेत्राकरिता लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रधान मंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत 0.40 ते

             5 हेक्टर क्षेत्राकरिता ठिबक सिंचनाच्या मंजूर मापदंड प्रमाणे अनुदान देण्यास मान्यता.

v  कोकण विभागातील ज्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचा वापर करणे शक्य आहे, अशा शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचा लाभ देण्यात यावा. तसेच ज्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच बसविणे शक्य नाही. परंतु योजनेतील इतर घटकाचा लाभ घेवू इच्छितात,अशा शेतकऱ्यांना शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या झाडे जगवण्याच्या अटीवर अन्य घटकांचा लाभ देण्यास मान्यता.

v  कोकण विभागातील ज्या शेतकऱ्यांनी फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यापूर्वी त्याच सर्वे नंबर, गट नंबर करिता, ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला असल्यास व ठिबक सिंचन संचाचे आयुष्यमान (4 वर्षांपर्यंत), शिल्लक असल्यास पुनःश्च ठिबक सिंचन संच बसविणे, हा घटक न राबविता इतर घटकांचा लाभ देण्यात यावा.

v  लाभार्थ्याने लागवडीच्या पहिल्या वर्षी फळबाग लागवडीची नोंद 7/12 उताऱ्यावर घेतली असल्यास पहिल्या वर्षी 50 टक्के अनुदान देण्यात यावे. तथापि दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीचे उर्वरीत 50 टक्के अनुदान हे 7/12 उताऱ्यावर  फळपिकाची नोंद घेतल्यानंतरच देण्यास मान्यता.

रायगड जिल्ह्यासाठी या योजनेतून सामाजिक वर्गवारीनुसार सर्वसाधारण- रुपये 202 कोटी 24 लाख,  अनुसूचित जाती- रु.9 कोटी 19 लाख, अनुसूचित जमाती-रु. 1 कोटी 1 लाख, असे एकूण 212 कोटी 44 लाख इतका आर्थिक लक्षांक प्राप्त आहे.

तरी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना फळबाग लागवड योजनेत लाभ न घेवू शकणाऱ्या व 2 हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक फळबाग लागवड (कमाल 10 हेक्टर) करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

                                                                                                                                                                                                  मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी,

    रायगड-अलिबाग

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन