जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अलिबाग समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम कार्यक्रम संपन्न
अलिबाग,दि.6(जिमाका):- दि.5 जून 2023 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण, रायगड-अलिबाग, वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग, अलिबाग नगरपरिषद, लायन्स क्लब श्रीबाग, माणुसकी प्रतिष्ठान, स्वयंसिद्धा संस्था, आधार फाऊंडेशन, स्पर्धा विश्व अकॅडमी, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने व विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने अलिबाग समुद्रकिनारा येथे (दि.5 जून रोजी) सकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत श्रमदानातून समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम राबविण्यात आली तसेच यावेळी प्रिझम संस्थेच्या वतीने पथनाट्यातून जनजागृती देखील करण्यात आली.
सादर केलेल्या पथनाट्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत असणारे विविध घटक जसे, की प्लास्टिकचा अतिवापर, अतिशय जास्त वृक्षतोड, वनसंवर्धनाची आवश्यकता यासंदर्भात उत्तमरित्या जनजागृती करण्यात आली. लहानश्या कृतीतून आपण आपला परिसर स्वच्छ ठेवू शकतो, पर्यावरणाची काळजी घेऊ शकतो. सिंगल युज प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. वृक्ष संवर्धन ही एक सामाजिक जबाबदारी असून आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या निसर्गाची काळजी घेतल्यास ग्लोबल वॉर्मिंग, अनिश्चित पर्जन्य, अनिश्चित नैसर्गिक आपत्तींना आपण सामोरे जाऊ शकतो.
यावेळी वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, अलिबाग श्री.प्रसाद गायकवाड, अलिबाग नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री.अनिल चोपडा, लायन्स क्लब श्रीबागच्या अध्यक्षा ॲड.कला ताई पाटील, स्त्रीरोग तज्ञ डॉ.मेघा घाटे, श्रीबाग लायन्स क्लबचे उपाध्यक्ष संजय रावळे, बाबासाहेब चौगुले, विजय वनगे, प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी, आधार फाउंडेशनचे धनंजय कवठेकर, स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा तथा स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी, वनपाल सोनावणे, वनरक्षक उदय हटवार, निलेश शिंदे तसेच प्रिझम संस्थेचे कार्यकर्ते व स्पर्धा विश्व अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते.
पथनाट्यात विनोद नाईक, सुचित जावरे, विराज म्हात्रे, पूर्वा नाईक, समृद्धी पाटील आदी कलाकार सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्याकरिता सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
००००००००
Comments
Post a Comment