केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा-2023 पात्र उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीव्दारे आवेदनपत्र व शुल्क भरण्याची कार्यवाही करावी

 

रायगड(जिमाका)दि.30 :-महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023" या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. या परीक्षेचा दिनांक  संकेतस्थळावर कळविण्यात येईल. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीव्दारे आवेदनपत्र व शुल्क भरण्याची कार्यवाही करावी असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पत्रकाद्वारे कळविले आहे.

 दिनांक 05 जून 2023 अधिसूचने अन्वये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 या परीक्षेचे आयोजन माहे जून 2023 च्या शेवटच्या आठवडयामध्ये घेण्याचे नियोजित होते. परंतु मा.उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी विविध याचिका दाखल झालेल्या होत्या. त्यामुळे शासनाच्या दि. 20 जून 2023 अन्वये मान्यता मिळाल्यानुसार मा. न्यायालयीन दाखल याचिका व प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानुसार शासनाच्या दि.27 सप्टेंबर, 2023 निर्णयान्वये या परीक्षेच्या अर्हतेबाबत सुधारणा करण्यात आली आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

पात्र उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीव्दारे www.mscepune.in या संकेतस्थळावर दि.01 डिसेंबर ते दि. 08 डिसेंबर 2023 रोजी 23.59 वाजेपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क भरण्याची कार्यवाही करावी. यापूर्वी सर्व पात्रतेसह यशस्वीरीत्या ऑनलाईन पध्दतीने योग्य शुल्कासह आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

तसेच मा.न्यायालयाच्या आदेशान्वये ज्या उमेदवारांनी ईमेलव्दारे माहिती पाठवून परीक्षा शुल्काचा भरणा केला आहे, अशा उमेदवारांचे पडताळणी केली जाईल. त्यांच्या बँक खाते क्रमांकावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सदरील परीक्षा शुल्क यथावकाश परत करण्यात येईल. तथापि या उमेदवारांना पुनश्चः ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क दिलेल्या मुदतीत भरणे बंधनकारक राहील, असे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद केंद्र पुणे डॉ.नंदकुमार बेडसे यांनी कळविले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन