जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने थांबविले महाड तालुक्यातील दोन बालविवाह
रायगड-अलिबाग,दि.08(जिमाका) :- महाड तालुक्यातील नांदगाव खुर्द येथील दोन अल्पवयीन बालिकांचे बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांनी नांदगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी, महाड शहर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक व कनिष्ठ संरक्षण अधिकारी यांच्या संयुक्त पथकाच्या समन्वयाने होणारे 2 बालविवाह थांबवले.
कनिष्ठ संरक्षण अधिकारी यांना बालविवाह बाबत गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी मुलींच्या वयाची खात्री केली असता त्या दोन्ही मुलींचे वय अनुक्रमे 16 वर्षे 8 महिने व 16 वर्षे 1 महिना असल्याचे आढळून आले. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार मुलीचे विवाहाचे वय किमान 18 वर्षे मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे त्यामुळे सदर विवाह बालविवाह असून तो कायद्याने बेकायदेशीर ठरत होता त्यामुळे वरील माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी जाऊन बालविवाह थांबवला.
या प्रकरणी अल्पवयीन बालकांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून बालिकांचे वय 18 पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा विवाह करणार नाही याबाबत बंध पत्र लिहून घेण्यात आले. अल्पवयीन मुलींना जिल्ह्याच्या बालकल्याण समितीच्या समोर सादर करण्यात येणार आहे.
जर आपल्या गावात बालविवाह होत असल्यास चाइल्ड हेल्पलाइन 1098 ला माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रायगड श्रीकांत हावळे यांनी केले आहे.
0000000
Comments
Post a Comment