समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर--प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत
रायगड-अलिबाग,दि.14(जिमाका):- विधी सेवा समितीच्या माध्यमातून जिल्हा व तालुका स्तरावर विधी सेवा समितीकडून वेळोवेळी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येत असतात. विधी सेवा समितीकडून अनेक बाबतीत मोफत कायदेविषयक सेवा पुरविली जाते. विधी सेवा समितीच्या या कार्याची माहिती सर्वांना व्हावी तसेच सर्वांसाठी न्याय ही संकल्पना सर्वत्र पोहोचावी आणि समाजातील सर्व घटकांना तातडीने न्याय मिळावा,यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा समितीचे अध्यक्ष राजेंद्र सावंत यांनी आरसीएफ हॉल कुरूळ येथील सभागृहात संपन्न झालेल्या विधी सेवा महशिबिर, शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्यात केले.
या शिबिरास जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक आचल दलाल, जिल्हा विधी सेवा समितीच्या सचिव श्रीमती तेजस्विनी निराळे, जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष पवार, अलिबाग बार असोसएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील, जिल्ह्यातील न्यायालयांतील न्यायाधिश, शासनाच्या विविध खात्याचे अधिकारी, जिल्हा व जिल्ह्यातील तालुका विधी सेवा समिती मधील वकील वर्ग, अनेक मान्यवर, शासकीय कर्मचारी तसेच बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत म्हणाले की, या महामेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि त्यांना योजनांचा थेट लाभ मिळवून देणे हे आहे. जिल्हा विधी प्राधिकरणामार्फत अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू जनतेला व्हावी तसेच तळागाळातील विविध समाजातील घटकांपर्यंत पोहचावी आणि कोणताही नागरिक न्यायापासून वंचित राहू नये याकरिता हा महामेळावा आयोजित करण्यात आहे. संविधानाने सर्वांना समान न्यायाची संधी दिली आहे. त्यामुळे हा उपक्रम महत्वाचा असून सर्व घटकातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी श्री.सावंत यांनी जिल्हा व तालुका स्तरावर विधी सेवा समितीकडून राबविले जाणारे विविध उपक्रम व सेवांची माहिती उपस्थितांना दिली.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, रायगड मधील माझ्या कारकिर्दीतील हा दुसरा महामेळावा असून अशा महामेळाव्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत कायदेविषयक ज्ञान पोहचविणे, दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणे हा मुख्य उद्देश असल्यामुळे महामेळावा अतिशय महत्वाचा आहे. उच्चशिक्षित व्यक्तींनाही कायद्याचे ज्ञान नसते. त्यामुळे राष्ट्रीय विधी सेवा समितीने भविष्यात शाळेय स्तरावर कायद्याची तोंड ओळख देणारे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावेत असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या महामेळाव्यात शासनाच्या विविध विभागांचे 32 स्टॉल लावण्यात आले असून प्रत्येक विभागांनी आपल्या असलेल्या योजनांची तातडीने, तळमळीने अंमलबजावणी करुन योजनेचा लाभ तळागाळातील दुर्बल घटकांपर्यंत पोहचवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. हुडबळी नसलेला जिल्हा म्हणून रायगड जिल्ह्याची ओळख आहे. तसेच रायगड जिल्ह्यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. या जिल्ह्यातील प्रत्येक माणूस हा सतत कामकाजामध्ये मग्न असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्महत्या प्रमाण शून्य असलेला हा जिल्हा आहे. जिल्ह्यात नवनवीन प्रकल्प येत असून तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीमुळे भविष्यात रायगड जिल्हा विकासाचा केंद्र बिंदू म्हणून ठरणार आहे.याचवेळी त्यांनी महसूल खात्याकडून राबविल्या जाणाऱ्या विविध महत्त्वकांक्षी योजनांची सखोल माहिती दिली.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी आपल्या मनोगतात सामान्य प्रशासनाच्या विविध प्रकारच्या कर वसुलीमध्ये लोक अदालतीचा होणारा उपयोग सांगितला. तसेच त्यांच्या प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि ग्रामीण भागातील बचत गटांचे कार्य तसेच इतर बाबतीत महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी आपल्या मनोगतात पोलीस विभागांकडून राबविण्यात येणारे कायदे व त्याची अंमलबजावणी याबाबत उपस्थितांना माहिती दिली. तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांनी येथील महामेळाव्यात योजनांची मिळणारी माहिती कार्यक्रमास उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहचवावी, असे सांगितले.
अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या दारी शासनाच्या योजना पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच सहकारी वकील संतोष पवार यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला, विविध कायदेशीर हक्क, सरकारी योजना तसेच न्यायालयीन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.
या महामेळाव्यात शासनाच्या विविध खात्यांकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणारे 32 स्टॉल लावण्यात आले होते. याच कार्यक्रमात शासनाच्या विविध खात्यांमधील लाभार्थ्यांना धनादेश तसेच वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा समितीच्या सचिव श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी सांगितले की, शासनाकडून राबविण्याल्या जाणाऱ्या नाविन्य पूर्ण योजनांची माहिती तळागाळातील घटकांपर्यंत पोहचावी याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याकरिता आलेल्या सर्वांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच त्यांनी शासकीय योजना व कायदे विषयक असलेल्या सोयी-सुविधांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी विविध शासकीय विभागांनी लावलेल्या स्टॉलची पाहणी करुन योजनांची माहिती जाणून घेतली.
.000000

Comments
Post a Comment