खरीप हंगाम पिकस्पर्धेमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा
रायगड-अलिबाग,दि.१६ (जिमाका):- खरीप हंगाम पिकस्पर्धेमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे यांनी केले आहे.
या स्पर्धेत समाविष्ट पिके भात, नाचणी (रागी) असून पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत. शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमिन असणे व ती तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला एका वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकास स्वतःच्या शेतात भात पिकासाठी कमीत कमी 20 गुंठे व इतर पिकांसाठी 40 गुंठे (1) एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक.
अर्ज करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र- अ), प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12 उतारा, 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ अदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक / पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
भात, नाचणी पिकासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट अशी आहे. स्पर्धेसाठी शुल्क - प्रत्येक पिकासाठी सर्वसाधारण गटासाठी रु. 300/-, आदिवासी गटासाठी -रु.150/-.
पिकस्पर्धा विजेते बक्षिसाचे स्वरुप व वितरण : तालुका पातळी सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये-पहिले 5 हजार, दुसरे 3 हजार, तिसरे 2 हजार. जिल्हा पातळी पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार, तिसरे 5 हजार. राज्य पातळी पहिले 50 हजार, दुसरे 40 हजार, तिसरे 30 हजार. पिकस्पर्धेत सहभागी होण्यासाठी संबंधित सहाय्यक कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
००००००
Comments
Post a Comment