मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बँक शाखा व्यवस्थापक व कर्ज अर्जदारांची एकत्रित समन्वय बैठक संपन्न
अलिबाग,दि.13 (जिमाका):- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बँक शाखाकडे मंजूरीकरिता शिफारस केलेल्या एकूण प्रकरणात नामंजूर,प्रलंबित प्रकरणाची एकूण संख्या जिल्ह्यात जास्त असल्याने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बँक शाखा व्यवस्थापक व अर्जदारांची एकत्रित समन्वय व आढावा बैठक (दि.12 डिसेंबर 2022) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळया, जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक विजय कुलकर्णी तसेच प्रमुख बँक शाखा व्यवस्थापक व प्रलंबित, कर्ज नामंजूर प्रकरणांचे अर्जदार उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळया यांनी रायगड जिल्ह्याकरिता सन-2022-23 वर्षाकरिता 800 प्रकरणाचे उद्दिष्ट प्राप्त असून जिल्हा कार्यबल समितीच्या मंजूरीने एकूण 900 पेक्षा जास्त अर्ज बँक शाखांकडे मंजुरीकरिता पाठविण्यात आले असून बँकेने या योजनेंतर्गत केवळ 153 अर्ज मंजूर केले आहेत. तसेच बँकेकडे एकूण 469 प्रकरणे मंजूरीकरिता प्रलंबित आहेत, असे यावेळी सांगितले. ...