विशेष सखोल पुनरीक्षण 2026' (SIR) कार्यक्रम माहिती घेण्याकरिता येणाऱ्या मतदान केंद्राच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदारांनी संपूर्ण सहकार्य करावे --जिल्हाधिकारी किशन जावळे
रायगड-अलिबाग, दि.29 (जिमाका):- मा.भारत निवडणूक आयोगाने दि.14 मे 2026 रोजीच्या पत्रान्वये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षणाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यासह 16 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये घोषित केला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात दि.30 जून ते दि.29 जुलै 2026 या कालावधीत 'विशेष सखोल पुनरीक्षण 2026' (SIR) मोहीम राबवली जात आहे. या 'विशेष सखोल पुनरीक्षण 2026' (SIR) मोहीमेमध्ये माहिती घेण्याकरिता येणाऱ्या मतदान केंद्राच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यास (BLO) मतदारांनी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
मा.भारत निवडणूक आयोगाने दि.14 मे 2026 रोजीच्या पत्रान्वये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षणाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यासह 16 राज्य व 3 केंद्र शासिक प्रदेशांमध्ये घोषित केला असून त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. विशेष सखोल पुनरिक्षणासाठी अर्हता दिनांक- दि.1 ऑक्टोबर 2026 , तयारी, प्रशिक्षण व छपाई-20 जून ते दि.29 जून 2026, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यामार्फत (BLO) घरोघरी भेटी-दि.30 जून ते दि.29 जुलै 2026, मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण-दि.29 जुलै 2026 पर्यंत, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी-दि.5 ऑगस्ट 2026, दावे व हरकती दाखल करण्याचा कालाधी-दि.5 ऑगस्ट ते दि.4 सप्टेंबर 2026, नोटीस टप्पा,दावे व हरकती निकालात काढणे-दि.5 ऑगस्ट ते दि.3 ऑक्टोबर 2026, अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी-दि.7 ऑक्टोबर 2026.
मतदार यादीत पात्र नागरीकाचा समावेश करणे रहाणार नाही (No eligible citizen is left out) व मतदार यादीत कोणत्याही अपात्र व्यक्तीचा समावेश होणार नाही (No ineligible person is included) हे मा.भारत निवडणूक आयोगाचे या कार्यक्रमाबाबतचे घोषवाक्य आहे.
या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदार संघातील 02 हजार 790 मतदान केंदांशी जोडलेल्या 25 लाख 33 हजार 739 मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठीची पात्रता तपासली जाणार आहे. त्याचा तपशिल पुढील प्रमाणे आहे.
पनवेल 188-मतदान केंद्रे 574, एकूण मतदार संख्या 6 लाख 84 हजार 95, सन-2002 चे यादीशी जोडणे (Mapping) केलेले मतदार टक्केवारी 35.11, जोडणी (Mapping) मधील त्रूटींची टक्केवारी 27.4. कर्जत 189-मतदान केंद्रे 362, एकूण मतदार संख्या 3 लाख 57 हजार 255, सन-2002 चे यादीशी जोडणे (Mapping) केलेले मतदार टक्केवारी 58.68, जोडणी (Mapping) मधील त्रूटींची टक्केवारी 13.8. उरण 190-मतदान केंद्रे 355, एकूण मतदार संख्या 3 लाख 19 हजार 337, सन-2002 चे यादीशी जोडणे (Mapping) केलेले मतदार टक्केवारी 76.85, जोडणी (Mapping) मधील त्रूटींची टक्केवारी 14.2. पेण 191-मतदान केंद्रे 380, एकूण मतदार संख्या 3 लाख 09 हजार 580, सन-2002 चे यादीशी जोडणे (Mapping) केलेले मतदार टक्केवारी 77.04, जोडणी (Mapping) मधील त्रूटींची टक्केवारी 10.9. अलिबाग 192-मतदान केंद्रे 375, एकूण मतदार संख्या 2 लाख 95 हजार 449, सन-2002 चे यादीशी जोडणे (Mapping) केलेले मतदार टक्केवारी 82.57, जोडणी (Mapping) मधील त्रूटींची टक्केवारी 13.6. श्रीवर्धन 193-मतदान केंद्रे 351, एकूण मतदार संख्या 3 लाख 5 हजार 343, सन-2002 चे यादीशी जोडणे (Mapping) केलेले मतदार टक्केवारी 85.85, जोडणी (Mapping) मधील त्रूटींची टक्केवारी 11.8. महाड 194-मतदान केंद्रे 393, एकूण मतदार संख्या 2 लाख 62 हजार 680, सन-2002 चे यादीशी जोडणे (Mapping) केलेले मतदार टक्केवारी 88.05, जोडणी (Mapping) मधील त्रूटींची टक्केवारी 13.8.
मतदारास मतदान केंद्रासाठी नेमलेला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) दि.30 जून ते 29 जुलै, 2026 या कालावधीत मतदाराच्या घरी भेट देऊन मतदाराचे किंवा त्याच्या आई/वडील/आजी/आजोबांचे सन 2002 मधील मतदार यादीतील नावाचा तपशील लिहीलेला आपले गणना प्रपत्र (Enumeration Form) दाखवेल. हा तपशिल बरोबर आहे किंवा कसे याबाबत मतदाराने मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यास सांगावे. तपशील चुकीचा असेल तर मतदाराने त्याचे सन 2002 साली नांव कुठे होते याची माहिती मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यास देऊन नाव शोधण्यास मदत करावी.
मतदाराने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या गृहभेटीपूर्वी शक्य झाल्यास voters.eci.gov.in/ECINet App वर सन 2002 चे मतदार यादीतील आपला तपशिल शोधून ठेवावा. मतदाराचे किंवा त्याच्या आई/वडील/आजी/आजोबा यांचे नांव सन 2002 चे मतदार यादीत असेल तर आपले नाव मतदार यादीत समावेश करण्यासाठी वेगळयाने कोणतेही पुरावे देण्याची आवश्यकता नाही. मतदाराचे किंवा त्याच्या आई/वडील/आजी/ आजोबा यांचे नांव सन 2002 चे मतदार यादीत नसेल तर त्याल्या जन्म तारखेनुसार गणना प्रपत्रात नमूद केलेले पुराव्याची कागदपत्रे आपणांस सुनावणीच्या वेळी मतदान नोंदणी अधिकारी/ सहायक मतदान नोंदणी अधिकारी यांचेकडे जमा करावी लागतील. दि. 05 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या मतदान केंद्राची प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होईल. या यादीत मतदाराच्या नावाचा समावेश नसल्यास किंवा कोणाच्या नावाचा समावेशाबाबत हरकत असल्यास तो मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दि. 05 ऑगस्ट ते 04 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे व हरकती दाखल करू शकतो. मतदार नोंदणी अधिकारी मतदाराने दाखल केलेल्या दावे व हरकतींची दिनांक 05 ऑगस्ट ते दि.03 ऑक्टोंबर 2026 या कालावधीत सुनावणी घेऊन ते निर्णीत करतील. अंतिम मतदार यादी दिनांक 07 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिध्द होईल.
या अंतिमरित्या प्रसिध्द झालेल्या मतदार यादीमध्ये मतदाराने दाखल केलेले दावे किंवा हरकती फेटाळण्यात आल्या असतील तर तो पुढील 15 दिवसांत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड यांना अपिल करू शकतो व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड निर्णयाने आपण व्यतिथ झाला असाल तर पुढील 15 दिवसांत आपण मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अंतिम अपिल दाखल करू शकता.
०००००००

Comments
Post a Comment