अमृतची हरित ऊर्जा क्षेत्राकडे वाटचाल; राज्यभरात 'अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन' उपक्रम युवक, महिला व ग्रामीण उद्योजकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी
रायगड-अलिबाग, दि. ३० (जिमाका) : हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या 'Go Green India' आणि 'Sustainable Mobility' या संकल्पनांच्या अनुषंगाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या माध्यमातून राज्यभरात 'अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन' व्यवसाय प्रोत्साहन उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून युवक, महिला उद्योजक, स्वयं सहाय्यता गट (SHG), सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील उद्योजक तसेच ग्रामीण भागातील इच्छुक नागरिकांना ईव्ही (Electric Vehicle) चार्जिंग स्टेशन व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन, व्यवसाय सल्ला आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत असून त्यानुसार ईव्ही चार्जिंग स्टेशनचे विस्तृत जाळे उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पेट्रोल पंपांप्रमाणे राज्यातील विविध भागांत ईव्ही चार्जिंग स्टेशनची मागणी वाढत असून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. राज्यातील युवकांनी या संधींचा लाभ घ्यावा, या उद्देशाने अमृतने हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.
व्यवसायाच्या विविध संधीया उपक्रमाअंतर्गत ईव्ही चार्जिंग स्टेशनची उभारणी, संचालन व व्यवस्थापन, चार्जिंग उपकरणांची देखभाल, सौरऊर्जेवर आधारित चार्जिंग सुविधा, ग्रीन एनर्जी सेवा, ईव्ही संबंधित तांत्रिक सेवा, फ्रँचायझी मॉडेल व्यवसाय तसेच ग्रामीण भागात चार्जिंग हब उभारणी अशा विविध क्षेत्रांत व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. भविष्यात ईव्ही क्षेत्र हे सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या उद्योगांपैकी एक ठरणार असल्याने प्रशिक्षित उद्योजकांना मोठा लाभ मिळणार आहे.
प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य-या उपक्रमात सहभागी लाभार्थ्यांना ईव्ही क्षेत्राविषयी मूलभूत ते प्रगत प्रशिक्षण, व्यवसाय नियोजन, प्रकल्प अहवाल तयार करणे, चार्जिंग स्टेशन स्थापनेसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजनांची माहिती, बाजारपेठेचा अभ्यास तसेच व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. भारतीय स्वदेशी कंपन्या आणि क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.याशिवाय, अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभही पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यामुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळण्यास मदत होणार आहे.
पात्रता-या उपक्रमाचा लाभ युवक-युवती, महिला उद्योजक, स्वयं सहाय्यता गट, एमएसएमई उद्योजक, शेतकरी उत्पादक गट, ग्रामीण उद्योजक तसेच स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणारे नागरिक घेऊ शकतात. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्यासाठी अमृतच्या लक्षित गटासाठी निर्धारित पात्रता व अटी लागू राहतील.
रोजगाराच्या नव्या संधी-ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायाबरोबरच ऊर्जा व्यवस्थापन, चार्जिंग नेटवर्क ऑपरेशन, इलेक्ट्रिकल देखभाल, ग्रीन एनर्जी प्रकल्प, ईव्ही उपकरण विक्री व सेवा तसेच उद्योजकता विकास या क्षेत्रांमध्येही रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भागातील युवकांसाठी हा व्यवसाय उत्पन्नाचे प्रभावी साधन ठरू शकतो.
अर्ज करण्याची प्रक्रिया-इच्छुक उमेदवारांनी अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन 'योजना' विभागातील 'विशेष योजना – EV Charging Station Partner' या पर्यायातून ऑनलाइन अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा. संकेतस्थळावर राज्यातील सर्व जिल्हा व्यवस्थापकांचे संपर्क क्रमांक, कार्यालयांचे पत्ते व इतर तपशील उपलब्ध आहेत.
हरित महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे पाऊल-अमृतच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला चालना मिळण्याबरोबरच हरित ऊर्जेचा वापर वाढण्यास मदत होणार आहे. तसेच युवक, महिला आणि ग्रामीण उद्योजकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होऊन आत्मनिर्भर महाराष्ट्राच्या उभारणीस बळ मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :अमृत जिल्हा व्यवस्थापक, रायगडमो. ९११२२२८७५९कार्यालय : अमृत रायगड जिल्हा कार्यालय (भूसंपादन), उपजिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी, हिराकोट तलावासमोर, अलिबाग, जि. रायगड.
ऑनलाइन अर्ज व अधिक माहितीसाठी : https://mahaamrut.org.in/
0000000
Comments
Post a Comment