विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन (ग्रामीण) योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन
रायगड-अलिबाग,दि.01(जिमाका):- भारत सरकारव्दारे विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) VB-G RAM G अधिनियम, 2025 मंजूर केले असून सदर अधिनियम सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम (MGNREGA) ऐवजी अस्तित्वात येत असून दि.1 जुलै, 2026 पासून राज्यात सर्वत्र अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुषंगाने गुरुवार, दि.02 जुलै 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा नियोजन भवन, अलिबाग येथे विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन (ग्रामीण) (VB-G RAMG) योजनेचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक रविंद्र राठोड यांनी दिली आहे.
केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या संबंधित केंद्रीय कायदा 2025 शी सुसंगत तरतुदींचा समावेश करून महाराष्ट्र राज्यात विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन (ग्रामीण) (VB-G RAM G) योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्य शासनाने अध्यादेश जारी केला आहे. तसेच, महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, 1977 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठीचे विधेयक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांपुढे विचाराधीन आहे.
या योजनेंतर्गत ग्रामीण अकुशल कामगारांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या रोजगाराची मर्यादा 100 मनुष्यदिवसांवरून 125 मनुष्यदिवसांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच योजनेअंतर्गत हाती घेता येणाऱ्या कामांच्या प्रकारांची संख्या 256 वरून 318 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण सुधारणांमुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच शाश्वत सार्वजनिक मालमत्ता निर्माण होण्यासही मोठा हातभार लागणार आहे.
योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, विविध शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजू व अकुशल मजुरांना अधिक प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. राज्यातील ग्रामीण नागरिकांना या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळण्यास मदत होईल.
000000
Comments
Post a Comment