वरसोली येथे पाठांतर स्पर्धा संपन्न
रायगड-अलिबाग, दि.९(जिमाका) :- महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी(अमृत) अलिबाग आणि उद्यम सखी संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने रामजी देवस्थान,रामनाथ,वरसोली अलिबाग येथे ६ ते १० आणी ११ ते १८ या वयोगटातील अमृत वर्गामध्ये येणाऱ्या मुलांसाठी एक पाठांतर स्पर्धा (रविवार दि. ५ एप्रिल २०२६) रोजी संपन्न झाली.
मुलांमधे भारतीय संस्कृतीच्या,हिंदू धर्माच्या,भारतीय राष्ट्रीयत्वाच्या संस्कारांची रुजवात होणं व त्यांचं संवर्धन होणं,त्याच बरोबर ईशभक्ति निर्माण होणं यासाठी अमृत संस्था गेल्या काही महिन्यांपासून मुलामुलींच्या संघटनासाठी प्रयत्नशील असून नियमितपणे त्यांच्यात परस्पर सामंजस्य,सलोखा,सहकार्य निर्माण होण्यासाठी काही बैठे/मैदानी खेळ,स्तोत्रपठण इ.कार्यक्रम राबवीत असते.
या उपक्रमाला स्थानिकांकडून उत्साहवर्धक म्हणता येईल असा प्रतिसाद मिळत असून त्याचंच दृश्य स्वरूप म्हणजे नुकतीच आयोजित केलेली स्पर्धा होय. या स्पर्धेत अमृतचे श्री.शैलेश वि.मराठे यांनी पुढाकार घेतला होता. तसंच उद्यम सखी संस्था अलिबाग यांच्या सौ.प्रार्थना दामले नागवेकर अलिबाग यानी त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले. रामजी देवस्थानच्या विश्वस्तांनीसुद्धा मोठ्या आपलेपणानं या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ. अनघा मराठे, कुमारी जान्हवी पाटील,सौ प्रणिता म्हात्रे यांनी काम पाहिले.
००००००००
Comments
Post a Comment