काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकाचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश "रोबोटिक बोयो" ची उपयुक्तता पुन्हा झाली अधोरेखित



रायगड-अलिबाग,दि.22(जिमाका): ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी काशीद बीचवर आलेल्या एका पुणेकर कुटुंबावर आज सकाळी काळाने झडप घातली होती. मात्र, पोलिसांच्या प्रसंगावधान आणि तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला असून, एका २० वर्षीय तरुणीला समुद्रात बुडताना अगदी ऐनवेळी सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण च्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या "रोबोटिक बोयो" ची उपयुक्तता या प्रसंगामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. या रिमोट ऑपरेटेड वॉटरक्राफ्टमुळे वीस वर्षीय तरुणीचा जीव वाचविण्यास प्रशासनाला यश मिळाले आहे.

     आज सकाळी 7.40 वाजताच्या सुमारास, पुणे येथील रहिवासी असलेले आकाश साबळे आणि सिद्धी साबळे हे आपल्या कुटुंबासह काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आले होते. हे कुटुंब पोहण्यासाठी पाण्यात उतरले. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने सिद्धी साबळे (वय 20 वर्षे) ही तरुणी अचानक समुद्राच्या खोल पाण्यात ओढली जाऊ लागली आणि बुडत असल्याचे लक्षात आले.  या कठीण प्रसंगी कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई (बकल नंबर 1028) प्रविण रोटकर आणि पोलीस शिपाई (बकल नंबर 1531) जितेंद्र माने यांनी जराही वेळ न गमावता तात्काळ धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या पोलीस कर्मचाऱ्यांनी वॉटरक्राफ्टच्या (रोबोटिक बोयो) मदतीने वेगाने समुद्रात धाव घेतली बुडणाऱ्या सिद्धी साबळे हिला सुखरूप बाहेर काढले.   

     या देवदूत ठरलेल्या रोबोटिक बोयो, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वांनी आभार मानले आहेत.

000000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन