मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांना जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
रायगड-अलिबाग,(जिमाका) दि.16: मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरे अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या "प्रोजेक्ट आशादीप" अभियानाला जिल्ह्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 13 आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमधून 867 लाभार्थ्यांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला.
मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, पोयनाड येथे विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी, पंचायत समिती अलिबागच्या सभापती भाग्यता पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.पद्मश्री आंधळकर यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी-कर्मचारी, आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.
शिबिरात लाभार्थ्यांची रक्तदाब (BP), रक्त तपासणी (CBC), रक्तातील साखर (BSL), ईसीजी (ECG), नेत्र तपासणी, आयुष्मान कार्ड व आभा (ABHA) कार्ड नोंदणी करण्यात आली. तसेच आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एएनसी (ANC) क्लिनिकचे आयोजन करण्यात आले असून एका लाभार्थ्यास एचपीव्ही (HPV) लसीकरण करण्यात आले. या शिबिरात 87 ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, रेवदंडा (ता.अलिबाग) येथेही "प्रोजेक्ट आशादीप" अंतर्गत आयोजित आरोग्य शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीसह विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. या शिबिरात 234 नागरिकांनी सहभाग नोंदवून आरोग्य सुविधांचा लाभ घेतला.
जिल्हाभरात सुरू असलेल्या या अभियानातून ज्येष्ठ नागरिकांची सर्वंकष आरोग्य तपासणी, आयुष्मान भारत व आभा कार्ड नोंदणी, विविध तपासण्या, आरोग्य मार्गदर्शन तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत असून, आगामी काळातही जिल्ह्यात विविध ठिकाणी अशी शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
०००००
Comments
Post a Comment