जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर हा महत्वपूर्ण उपक्रम—पालकमंत्री भरतशेठ गोगावले

 


रायगड-अलिबाग(जिमाका)दि.21:- शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" (Maha Walkathon-Walk for Water) या महत्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून "पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा" हा जलसंधारणाचा संदेश नागरिक, विद्यार्थी, युवक-युवती, महिला, शेतकरी व विविध सामाजिक घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी या अभियानामध्ये सर्वांचा सक्रिय सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी  आज येथे केले. 

अलिबाग बीच येथे जिल्हा प्रशासन व जलसंधारण विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय महा वॉकेथॉन 2026 वॉक फॉर वॉटर आयोजित कार्यक्रमात ते  बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रम पाटील, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी कविजीत पाटील आदि उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले की, माजी मुख्यमंत्री जलक्रातींचे जनक दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय जलसंधारण दिन साजरा करण्यात आला ही अभिमानाची बाब आहे.  शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे आवश्यक असून त्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता राज्यात दि. १५ ते २१ ऑगस्ट, २०२६ दरम्यान "जलसंधारण सप्ताह" आणि १५ ऑगस्ट, २०२६ ते २६ जानेवारी, २०२७ दरम्यान "जलसंधारण अभियान" आयोजित करण्यात आले आहे.  पाणी आहे  तर शेती  आहे, शेती आहे तर शेतकऱ्याच्या घरात सुख आणि समृध्दी आहे.  पाणी हे  केवळ आजची गरज नाही तर ते पुढील पिढीचे भविष्य आहे. "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" माध्यमातून "पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा" हा जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्याची तरुणांनी सहभाग घ्यावा.  पाणी वाहून जावू न देता ते अडवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.  जलसंधारण केवळ शासनाची जबाबदारी  नाही  तर प्रत्येक नागरीकांची जबाबदारी आहे.  व्हीबीजी रामजी योजनेंतर्गत जिल्ह्यात जलसंधारण, जलपुर्नभरण अशी अनेक विविध विकास कामे सुरु असून "पाणी अडवा, पाणी जिरवा, हा संदेश जिल्ह्यातील गावा-गावापर्यंत पोहोचवावा असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.  या उपक्रमाची थीम सेव सॉईल, सेव वॉटर, सीक्यूर टूमारो ( Save Soil, Save Water, Secure Tomorrow) अशी असून पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे घोषवाक्य आहे. 

कार्यक्रमाची सुरुवात माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन, दिपप्रज्वलन तसेच उपस्थितांना जलसंधारणाबाबतची शपथ देवून करण्यात आली.

या रॅलीला पालकमंत्री भरत गोगावले यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात अलिबाग बीच येथून निघून बालाजी मंदिर, छत्रपती  शिवाजी चौक, ठिकरुळ नाका, रायगड बाजार मार्गे, अलिबाग बसस्टँड, अलिबाग नगर परिषद, जवळून बालाजी नाका मार्गे पुन्हा अलिबाग बीच येथे समाप्त करण्यात आली. 

कार्यक्रमानंतर पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्याहस्ते जिल्ह्यातील विविध क्रिडा स्पर्धा, जलतरण स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना तसेच "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" विजेत्या स्पर्धकांना मेडल, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थींनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन