जनगणना-2027 अंतर्गत स्व-गणना सुविधेचा लाभ घ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन
रायगड-अलिबाग, दि.13 (जिमाका) : भारताची जनगणना-2027 ही प्रथमच डिजिटल पद्धतीने करण्यात येणार असून नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
भारत सरकारच्या जनगणना संचालनालयामार्फत जनगणना-2027 अंतर्गत घरगुती व घरगणना टप्प्याचे क्षेत्रीय कार्य दि. 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत पार पडणार आहे. यंदाची जनगणना ही पूर्णतः डिजिटल स्वरूपात होत असून नागरिकांना https://se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन स्व-गणना करता येणार आहे.
स्व-गणना प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याने सर्व शासकीय कार्यालये तसेच अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांनी या मोहिमेचा प्रसार करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना स्व-गणनेबाबत मार्गदर्शन करावे तसेच कार्यालयीन संकेतस्थळ, सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप समूह आदी माध्यमांतून जनजागृती करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
जनगणना हे राष्ट्राच्या विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य असून विविध शासकीय योजनांच्या आखणीसाठी जनगणनेतील आकडेवारीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. त्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
000000
Comments
Post a Comment