विशेष सखोल पुनरीक्षण 2026' (SIR) मोहिमेंतर्गत माहिती घेण्यासाठी घरोघरी येणाऱ्या शासकीय प्रतिनिधींना सहकार्य करावे-- तहसिदार रोहा डॉ.किशोर देशमुख
रायगड-अलिबाग,दि.29(जिमाका):- भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रोहा तालुक्यात विशेष सखोल पुनरीक्षण 2026' (SIR) मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचे वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केले असून मतदार यादीतील नावांची पडताळणी किंवा दुरुस्ती करण्यासाठी काटेकोर नियोजन आखण्यात आल्याचे तालुका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. मात्र यानुषंगाने आवश्यक माहिती घेण्यासाठी आपल्या घरी येणाऱ्या शासकीय प्रितिनिधींना सहकार्य करावे, असे आवाहन सहा.मतदार नोंदणी अधिकारी, 191-पेण, 192-अलिबाग व 193 श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ तथा तहसिदार रोहा डॉ.किशोर देशमुख यांनी केले आहे.
प्रशासनाने यासाठी अत्यंत सुटसुटीत आणि नागरिकस्नेही नियोजन केले आहे. ज्याची ठळक वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेतः बीएलओ (BLO) स्वतः देणार घरोघरी भेट (30 जून ते 29 जुलै 2026) मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) स्वतः प्रत्येक नागरिकाच्या घरी भेट देणार आहेत. या काळात नोकरी करणारे घरी प्रत्यक्ष हजर नसले, तरी त्यांच्या कुटुंबातील इतर उपलब्ध सदस्य किंवा नातेवाईक बीएलओ अधिकाऱ्यांना माहिती देऊ शकतात तसेच गणना प्रपत्रावर मतदाराच्या वतीने स्वाक्षरी करून देऊ शकतात.त्यामुळे चाकरमान्यांना केवळ या कामासाठी सुट्टी घेण्याची गरज उरणार नाही.
आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा आणि ऑनलाईन सुविधेचा वापर :- प्रशासनाने डिजिटल प्रणालीवर विशेष भर दिला आहे. 05 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, नोकरदार मंडळी ते जिथे आहेत तिथूनच निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर (voters.eci.gov.in) किंवा 'व्होटर हेल्पलाईन' (Voter Helpline app) किंवा ECINET मोबाईल अॅपवर आपले नाव अत्यंत सहजसोप्या पद्धतीने तपासू शकतात.
ऑनलाईन दावे व हरकती दाखल करण्याची संधी (5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026) जर मतदार यादीत काही दुरुस्ती करायची असेल किंवा नाव जोडायचे, वगळायचे असेल, तर त्यासाठी 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने दावे व हरकती दाखल करता येतील. डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्यामुळे नागरिक कोणत्याही त्रासाशिवाय ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
राजकीय पक्षांचे प्रतिनिधी (BLA) करणार सहकार्य- आपापल्या मतदान केंद्रांवर राजकीय पक्षांचे अधिकृत मतदान केंद्र प्रतिनिधी (BLA) देखील उपस्थित राहणार आहेत. हे स्थानिक प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने नागरिकांच्या नावांची पडताळणी सहज पूर्ण होऊ शकते. "निवडणूक आयोगाची ही मोहीम पूर्णपणे लोकस्नेही आणि डिजिटल स्वरूपाची आहे. नागरिकांनी आपल्या कामाचा खोळंबा करण्याची गरज नाही. आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या माध्यमातून आणि डिजिटल साधनांचा वापर करून या मोहिमेला पूर्ण सहकार्य करावे.
पुनरीक्षण कार्यक्रम तपशील (2026)
दि 30 जून 2026 ते दि. 29 जुलै 2026 या कालावधीत बीएलओ घरोघरी भेटी देतील., आपल्याला विहित नमुन्यातील अर्ज देतील, त्या अर्जातील माहिती भरून घेतील. दि.05 ऑगस्ट 2026 प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध होईल. दि 05 ऑगस्ट 2026 ते 04 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे हरकती दाखल करता येतील. दि 05 ऑगस्ट 2026 ते 03 ऑक्टोबर 2026 या कालावधीत प्राप्त दावे व हरकतीवर निर्णय घेण्यात येणार. दि 07 ऑक्टोबर 2026 अंतिम मतदारयादी प्रसिध्द होईल.
तरी नार्गारकांनी आपल्या घरी येणाऱ्या शासकीय प्रतिनिधींना आपली व आपल्या कुटुंबियांची आवश्यक माहिती द्यावी आणि या राष्ट्रीय कार्यात आपलाही सक्रिय सहभाग नोंदवावा.
०००००००
Comments
Post a Comment