‘अमृत’तर्फे विश्वबंधुत्व पंधरवड्याचे आयोजन विविध संस्थांनी सहभागी व्हावे
रायगड-अलिबाग,दि.10(जिमाका):- स्वामी विवेकानंदांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो येथे जागतिक धर्म संसदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणातून जगाला दिलेला सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता, मानवता, परस्पर सन्मान आणि विश्वबंधुत्वाचा संदेश समाजाच्या विविध घटकांपर्यंत व्यापक स्वरूपात पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने सन 2026 पासून दरवर्षी दि.11 सप्टेंबर ते दि.26 सप्टेंबर 2026 दरम्यान ‘विश्वबंधुत्व पंधरवड्याचे आयोजन करण्यात येणार असून विविध संस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे.
आजच्या बदलत्या सामाजिक व जागतिक परिस्थितीत विविधता, मतभिन्नता आणि सामाजिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक ऐक्य, सहिष्णुता, परस्पर सन्मान आणि बंधुभावाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर विश्वबंधुत्वाचा विचार केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीत आणण्याच्या उद्देशाने हा पंधरवडा आयोजित करण्यात येत आहे.
‘शिकागो भाषण कृती कार्यक्रम’ विशेष आकर्षण
या पंधरवड्याचे प्रमुख आकर्षण ‘शिकागो भाषण कृती कार्यक्रम’ हे आहे. स्वामी विवेकानंदांच्या शिकागो भाषणातील विचार समजून घेऊन ते दैनंदिन जीवनात आचरणात आणण्यासाठी या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सहभागी संस्थांनी आपल्या स्तरावर विविध स्पर्धा, चर्चासत्रे, व्याख्याने, जनजागृतीपर उपक्रम तसेच मूल्याधिष्ठित कार्यक्रम आयोजित करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक आणि नागरिकांमध्ये विश्वबंधुत्व, मानवता, सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
शैक्षणिक, सामाजिक व विविध संस्थांचा सहभाग
या अभियानात शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच विविध खाजगी आस्थापनांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे. प्रत्येक संस्थेने आपल्या कार्यक्षेत्रानुसार उपक्रम आयोजित करून त्यामध्ये विद्यार्थी, युवक आणि नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवावा, अशी अपेक्षा आहे.
अमृत संस्थेच्या माध्यमातून कौशल्य विकास, उद्योजकता, शैक्षणिक व आर्थिक प्रगती तसेच सामाजिक व सांस्कृतिक जाणीव वाढविणारे विविध उपक्रम राबविले जातात. समता, सामाजिक न्याय, बंधुत्व, सामाजिक ऐक्य आणि मानवता ही मूल्ये समाजजीवनात अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने विश्वबंधुत्व पंधरवड्याचे आयोजन करण्यात येत आहे.
ऑनलाइन नोंदणीचे आवाहन
‘विश्वबंधुत्व पंधरवडा’ अभियानात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असून, त्यासाठी https://vbd.mahaamrut.org.in/ या पोर्टलवर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या संस्थांनी त्यानंतर आपल्या स्तरावर ‘शिकागो भाषण कृती कार्यक्रम’ अंतर्गत विविध उपक्रम आयोजित करावेत.
“विविधतेतून एकता, एकतेतून बंधुता आणि बंधुतेतून सशक्त समाज व समर्थ राष्ट्र!” या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्रातील विविध संस्था, विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि विश्वबंधुत्वाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावा.
००००००
Comments
Post a Comment