गणेशोत्सव काळात माणगाव-इंदापूर येथे ‘नो पार्किंग झोन’


 

रायगड-अलिबाग, दि. ११ (जिमाका) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर वाहतूक कोंडी होऊ नये तसेच वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी, यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाने माणगाव व इंदापूर येथील महामार्गालगतच्या काही भागात दोन्ही बाजूंनी ‘नो पार्किंग झोन घोषित केला आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे व पालघर परिसरातील गणेशभक्त मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी कोकणातील आपल्या मूळ गावी जातात. यामुळे गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर वाहनांची मोठी वर्दळ वाढते. त्यातच दि. ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान मोठ्या संख्येने एस.टी. बसेस कोकणाकडे रवाना होणार असल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

माणगाव व इंदापूर येथील बाजारपेठा मुंबई-गोवा महामार्गावर असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची मोठी वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच अपघाताची शक्यताही लक्षात घेऊन ही उपाययोजना करण्यात आली आहे.

 

माणगाव येथील- रेड्डीज हॉटेल ते ढालघर फाटा, निजामपूर नाका ते कालवा रोड, मोर्बा नाका ते पवार वाडा हॉटेल तसेच इंदापूर येथील- माहि हॉटेल ते कशेने बायपास या मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ‘नो पार्किंग झोन लागू करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, रायगड-अलिबाग यांच्या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र शासन गृहविभागाच्या अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५, ११६ (१) (अ) (ब), ११७ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३३ अन्वये पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी हा आदेश जारी केला आहे.

ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. दरम्यान, जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका, शासकीय वाहने, इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच व्यवस्थापनाच्या अधिकृत पासधारक वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.गणेशभक्त व वाहनचालकांनी प्रशासनास सहकार्य करून निर्धारित ठिकाणी वाहने पार्क न करता वाहतूक सुरळीत ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन