महाड दुर्घटना 21 मृतदेहांचा शोध

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 05 ऑगस्ट, 2016                                                                     वृत्त क्र.480

महाड दुर्घटना
21 मृतदेहांचा शोध

            अलिबाग दि. 5 - महाड जवळील सावित्री नदीवर असलेल्या पुल कोसळल्याने वाहून गेलेल्या वाहनातील बेपत्ता व्यक्ती पैकी आज सायंकाळ सहा वाजेपर्यंत एकूण एकवीस जणांचे मृतदेह सापडले आहेत.  त्यांची ओळख पटलेली असून सदरील मृतदेह शवविच्छेदना नंतर संबंधितांच्या गावी पाठविण्यात येत आहेत.
महाड दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्तींच्या व वाहनांच्या शोधासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने युध्द पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. महाड येथे काल आपत्ती निवारण व मदत केंद्र उभारुन शोध मोहिमेबाबत सर्व संबंधितांना माहिती देण्यात येत आहे. पालकमंत्री प्रकाश महेता, जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधिक्षक मो.सुवेज हक हे शोध व मदत कार्याबाबत नियंत्रण करीत आहेत.
व्यापक शोध कार्य
या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा  तसेच वाहनांचा शोध घेण्यासाठी पाण्यामध्ये सेंसरद्वारे प्रयत्न सुरु आहेत. तसेच आज जिल्हा प्रशासनाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडेही (इस्त्रो) मदतीसाठी  विचारणा केली. मात्र ही संस्था जमीन व हवेत कार्य करीत असल्याने त्यांची मदत होत नाही. तथापि शोधकार्यासाठी तटरक्षक दल व हवाई दलाच्या हेलिकॉप्टरची मदत होत असून एन.डी.आर.एफ.च्या एकूण  चार पथकातील 160 जवान तसेच 9 बोटी व 8 डायव्हर्सद्वारे ही शोध कार्य सुरु आहे. स्थानिक पातळीवरील 35 पट्टीचे पोहणारे,  5 राफ्टरर्स, 6 केकेज् टीम त्याचप्रमाणे स्थानिक मच्छिमार बांधव यांच्या मदतीने शोध मोहिम  सुरु  आहे. जिल्हा पोलीस यंत्रणेचेही जवळपास 350 अधिकारी, कर्मचारी मदत करीत आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्या मार्गदर्शनाखाली 6 डॉक्टरांचे पथक, 12 पेक्षा अधिक रुग्णवाहिकेसह कार्यरत आहेत. नागरी संरक्षण दल, एस.टी. महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, विविध स्वयंसेवी संस्था, श्री संत निरंकारी मंडळ, सह्याद्री ॲडव्हेंन्चर ट्रेकर महाबळेश्वर यांचे पथक, व्हाईट आर्मी जीवन मुक्ती सेवा संस्था, कुंडलिका राफ्टींग असोशिएश्न, श्रमिक मच्छिमार संघ, मालवण आदिंचा मोठा सहभाग शोध मोहिमेत आहे.  अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शोध मोहिमेचे कार्य सुरु आहे. नदी प्रवाहाच्या पुढील भागातही त्या-त्या ठिकाणचे तालुका प्रशासन स्थानिकांच्या मदतीने बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत आहेत.
मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तसेच मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, महसूल प्रधान सचिव, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून मार्गदर्शन करीत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच तज्ञ मंडळी, प्रसार माध्यम, नागरीक यांच्या कडून आलेल्या सूचनांचाही विचार प्रशासन करीत असून त्यानुसार शोध मोहिम अधिक जोरात केली जात आहे. घटनास्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  केंद्रीय अवजड उदयोग मंत्री अनंत गिते, केंद्रीय गृहराजमंत्री हंसराज अहिर, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सा.उ.) एकनाथ शिंदे, रत्नागिरी पालकमंत्री रविंद्र वायकर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, आजी-माजी आमदार, यांनी भेट देऊन शोध कार्याची पाहणी केली व उपयुक्त सूचना दिल्या आहेत.
सापडलेल्या मृत व्यक्तींचे नावे
दिनांक 05/08/2016  सायं.6 वाजे  अखेर एकूण 21 मृतदेहांचा शोध घेण्यात आला असून त्यांची ओळख पटलेली  आहे. ती नावे पुढील प्रमाणे आहेत. 1.) श्रीकांत शामराव कांबळे,   2.) शेवंती मिरगल,  3.) संपदा संतोष वाझे, 4.) आवेद अल्ताफ चौगुले, 5.) पांडूरंग घाग, 6.) प्रशांत प्रकाश माने, 7.) स्नेहा सुनिल बैकर,  8.) प्रभाकर बाबुराव शिर्के, 9.) रमेश गंगाराम कदम, 10.) मंगेश राजाराम काटकर, 11.) सुनिल महादेव बैकर 12.) अनिश संतोष बेलेकर, 13.) अतिफ मेमन चौगुले 14.) बाळकृष्ण बाब्या वरक, 15.) अजय सिताराम गुरव, 16.) विजय विश्राम पंडित, 17.) विनिता विजय पंडित. 18.) संतोष सोनु गवतडे 19.) दिपाली कृष्णा बेलेकर, 20.) भिकाजी रामचंद्र वाघदरे, 21.) सुरेश देऊ सावंत.
जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून तेथील टोल फ्री क्रमांक 1077 व  दूरध्वनी क्रमांक 02141-222118 असा आहे. या ठिकाणी  माहिती तसेच मदत कार्याबाबत समन्वय  करण्यात येत आहे. अप्पर जिल्हाधिकारी पी डी मलिकनेर व निवासी उपजिल्हाधिकारी सतिश बागल हे नियंत्रण करीत आहेत. तसेच घटनास्थळी व तहसिलदार कार्यालय, महाड येथे मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे. बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांची भोजन व निवास व्यवस्था महाड येथे करण्यात आली आहे. महाडच्या उपविभागीय अधिकारी सुषमा सातपुते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे व त्यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी या नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन