एचआयव्ही संसर्ग रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश
अलिबाग, जि. रायगड, दि.27 - एचआयव्ही संसर्ग आणि त्यामुळे होणारा एडस हा
असाध्य आजार, ही 1990 च्या दशकातील स्थिती आता राहिलेली नाही. एडस बाबत होत असलेली
जनजागृती, त्यामुळे लोकांचे होणारे आरोग्यविषयक प्रबोधन, शासनाने उपलब्ध करुन
दिलेल्या मोफत आरोग्य व उपचार सुविधा
यासगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून रायगड जिल्ह्यात एचआयव्ही बाधित होण्याचे
प्रमाण घटले आहे. ही विशेष बाब. एचआयव्ही बाधीत गरोदर मातांकडून बाळाला होणारा
संसर्ग रोखण्यात तर जिल्ह्यातील आरोग्य
यंत्रणेला पुर्ण यश आले आहे, हे उल्लेखनीय.
मागील चौदा वर्षाचा (सन
2003 ते 2016)अभ्यास करता सन 2003 मध्ये 827 गरोदर मातांची एचआयव्ही समुपदेश व
तपासणी केली असता त्यामध्ये 6(0.7) एचआयव्ही संसर्गित गरोदर माता असल्याचे आढळून
आले. सन 2016 मध्ये एकूण 44052 इतक्या गरोदर मातांची एचआयव्ही समुपदेशन व तपासणी
केली असता त्यामध्ये 24(0.05 टक्के) एचआयव्ही संसर्गित गरोदर माता असल्याचे आढळून
आले. तसेच गरोदर मातेकडून तिच्या मुलाला होणारा एचआयव्ही संसर्गाला प्रतिबंध
करण्यामध्ये आरोग्य यंत्रणेला 100 टक्के यश आलेले आहे. आज हे प्रमाण शून्यावर आले
आहे.
मागील पंधरा वर्षाचा (सन 2002 ते 2016 )अभ्यास करता सर्व सामान्य जनतेमध्ये सन
2002 मध्ये 138 लोकांची एचआयव्ही समुपदेशन व तपासणी केली असता त्यामध्ये 58 (42
टक्के) एचआयव्ही संसर्गित असल्याचे आढळून आले. सन 2016 मध्ये एकूण 71,090 इतक्या
लोकांची एचआयव्ही समुपदेशन व तपासणी केली असता 404 (0.57टक्के) एचआयव्ही संसर्गित
असल्याचे आढळून आले. सन 2012 ते 2017 पर्यंतची आकडेवारी पाहता एचआयव्ही समुपदेशन व
तपासणीचे प्रमाण वाढलेले असून एचआयव्ही संसर्गित होण्याचे प्रमाण कमी झालेले आहे.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्याकरिता तसेच एचआयव्ही,एडस ला प्रतिबंध
करणेकरीता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी तसेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक
संजय माने व डापकू टीम जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड -अलिबाग यांचेकडून
कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येते. सर्व शासकीय रुग्णालयात संसर्गित रुग्णांना
मोफत उपचार व औषधे आणि समुपदेशन सुविधा उपलब्ध आहेत.
-डॉ. मिलिंद दुसाने, प्रभारी जिल्हामाहिती अधिकारी,
रायगड.
Comments
Post a Comment