31 मार्च साठी प्रशासनाची सज्जता; 30 रोजी सुटीच्या दिवशीही कोषागार कार्यालय सुरु



अलिबाग,जि. रायगड,(जिमाका)दि.15-मार्च 2018 अखेरीस देयके सादर करण्यासंदर्भात   सुसूत्रता यावी व बिम्स या संगणकीय प्रणाली व ट्रेझरी नेट प्रणाली  सुस्थापित रहावी यासाठी  प्रशासनाने सज्जता केली आहे. यासंदर्भात शासनाच्या वित्त विभागाने परिपत्रकाद्वारे सुचना निर्गमित केल्या असून सर्व विभागांनी त्यांचे पालन करुन देयके विहित मुदतीत सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज ई मुल्ला यांनी केले आहे.
 यासंदर्भात परिपत्रकान्वये सुचना जारी करण्यात आल्या आहेत की,  विविध विभागांनी त्यांच्याकडे उपलब्ध अनुदानानुसार प्रवास भत्ता देयके, आस्थापना विषयक पुरवणी देयके, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देयके  ही 23 मार्च पर्यंतच सादर करावयाची आहेत.  सुधारीत अंदाजपत्रक व पुरवणी मागण्यांद्वारे  प्राप्त अनुदानाची देयके  ही वर्षाअखेरीस उपकोषागार कार्यालयात सादर न करता शक्यतो जिल्हा कोषागार कार्यालयात  सादर करावे. उपकोषागार कार्यालयात दि.31 मार्च रोजी सायं. सहा वाजेनंतर देयके स्विकारली जाणार नाहीत. सायं. सहा नंतर जिल्हा कोषागार कार्यालयात देयके सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 31 मार्च रोजी बिम्स आणि ट्रेझरी नेट प्रणालीवर पडणारा प्रचंड ताण पाहता   सुधारीत अर्थसंकल्प आणि पुरवणी मागणीद्वारे प्राप्त अनुदान विभाग नियंत्रक अधिकाऱ्यांनी बवरीत उपलब्ध करुन घ्यावे. दि.30 मार्च रोजी सुटी असली तरी जिल्हा कोषागार कार्यालय व उपकोषागार कार्यालयातील कामकाज सुरु असेल. दि.1 एप्रिल 2017 ते 28  फेब्रुवरी 2018 या कालावधीत आक्षेपित केलेली देयके  23 मार्च पर्यंतच सादर करावीत. 1 फेब्रुवारी नंतरच्या खरेदीस वित्तविभागाची मान्यता असेल तरच देयके पारित होतील, अशा सुचना 31 मार्च पर्यंतच्या कालावधीसाठी शासनाने जारी केल्या असून सर्व आहरण संवितरण अधिकारी, विभागांचे नियंत्रक अधिकारी यांनी त्यांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज मुल्ला यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन