सायबर गुन्ह्यांच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी




            सद्याच्या डिजिटल युगामध्ये सायबर क्राईमचे प्रमाण वाढत आहे. नेटवर्किंगच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्हे हे आपल्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत पोहोचले आहेत. दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारी वाढत आहे. त्याला बळी पडणा-या नागरिकांची संख्याही वाढत आहे.  या गुन्ह्यांची शोध घेणारी यंत्रणा पोलीसांनी प्रभावीपणे कार्यान्वित केली आहे. महाराष्ट्रातील सर्वांत मोठी सायबर लॅब ठाणे शहर आयुक्ताच्या कार्यालयात सुरु करण्यात आली आहे.
सोशल मिडीया संबंधित गुन्हे- आपले फोटो, पासवर्ड, फोन नंबर व कुटूंबाची माहिती या सारख्या व्यक्तीगत गोष्टी सोशल मिडीयावर शेअर करू नका. सोशल मिडीयावर ओळख झालेल्या अनोळखी व्यक्तीला प्रत्यक्षात एकटे व अज्ञात ठिकाणी भेटू नका. सोशल मिडीयावर आक्षेपार्ह, भडकावू संदेश पाठवू नका. त्याचप्रमाणे अश्लील चित्रे/चित्रफिती पाठवू नका. हा कायद्याने गुन्हा आहे. इंटरनेटवरून पायरेटेड चित्रपट, गाणी, गेम्स आणि व्हिडीओ डाऊनलोड करू नका. नेट बँकिंग व ई-मेलचे पासवर्ड वरचेवर बदलत रहा. आपला पासवर्ड किमान 8 अक्षरांचा असावा ज्यात इंग्रजीतील लहान मोठी अक्षरे, चिन्हे व अंकाचा समावेश असावा. आपला वाय-फाय चांगल्या पासवर्डने सुरक्षित ठेवा आणि त्याचे लॉग इन कलेक्शन चालू ठेवून ते वरचेवर तपासा.
            क्रेडीट/डेबीट कार्ड फसवणूक- आपल्या क्रेडीट किंवा डेबीट कार्डचा 16 अंकी क्रमांक तसेच पिन नंबर, कार्डच्या मागील 3 अंकी सी.व्ही.व्ही. नंबर किंवा आपली व्यक्तीगत माहिती फोन किंवा ई-मेलवरून कोणालाही देऊ नका. आपले डेबीट कार्ड रद्द होणार आहे किंवा आपले के.वाय.सी. अद्ययावत करावयाचे आहे असे सांगून भामटे तुमची माहिती काढून घेतात. आपला ओ.टी.पी. क्रमांक कोणालाही सांगू नका. तो ऑन लाईन फसवणूकीच्या व्यवहारांसाठी वापरला जावू शकतो. आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी संलग्न करा. जेणेकरून बँकेच्या व्यवहाराची माहिती त्वरीत आपणांस मोबाईल मॅसेजद्वारे समजेल. ए.टी.एम. मशिनमध्ये पिन टाकतांना तो कोणीही पाहणार नाही त्यासाठी आपल्या हातावर दुसरा हात किंवा पेपर आडवा धरावा. ए.टी.एम. सेंन्टरमध्ये पैसे काढतांना अन्य कोणालाही आत येण्यास मज्जाव करा. नेट बँकिंग किंवा क्रेडीट/डेबीट कार्डचे व्यवहार सायबर कॅफे किंवा फ्रि वाय फायच्या ठिकाणी करू नका.
            पोन्झी (डबल मनी ) फसवणूक- अल्पावधीत पैसे दुप्पट करून देणार, दामदुप्पट व्याज देऊन आपली गुंतवणूक पुन्हा पुन्हा वाढवून देणार अशी आश्वासने देणा-या पोन्झी (डबल मनी) योजनांना भुलु नका. पोकळ आश्वासने व अफवांवर विश्वास ठेवून गुंतवणूक करू नका. गुंतवणूकीबाबत कागदपत्रे वाचल्याशिवाय व त्यातील फायदे तोटे व धोका समजून घेतल्याशिवाय गुंतवणूक करू नका. आपली सर्व गुंतवणक बँकिंगशी संबंध नसलेल्या वित्तीय कंपन्यात करू नका. ज्या सेबी किंवा रिझर्व बँक ऑफ इंडियाशी संलग्न नाहीत. नवीन स्थापन झालेल्या कंपन्या तसेच बँकिंगशी संबंध नसलेल्या वित्तीय कंपन्यांची बाजारातील पत पडताळणी केल्याशिवाय दिर्घ मुदतीच्या गुंतवणुका करू नका. काहीही फसवणूक झाल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणे किंवा आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क करा.
            इतर सायबर गुन्हे- परदेशात किंवा चांगल्या पगाराची नोकरी, मोठ्या रकमेची लॉटरी किंवा बक्षीस आणि मृत्युपत्राद्वारे मोठ्या रकमेचे अमिष बाबत फोन/एस.एम.एसद्वारे आपली फसवणूक होवू शकते. वरील संदेशांना भुलुन जावून कोणत्याही अन्य खात्यांवर पैसे पाठवू नका. नेहमी सर्च करावयाच्या वेब साईटचे अचुक नांव टाईप करून इंटरनेटवर सर्च करा. ई-मेलला उत्तर पाठविण्यापूर्वी ई-मेल ॲड्रेस बारकाईने तपासा. एकसारख्या दिसणा-या ई-मेलवर लॉगईन करून माहिती दिल्यास आपल्या माहितीचा आर्थिक व अन्य फसवणूकीसाठी गैरवापर होऊ शकतो. ईमेलचा व नेट बँकिंगचा पासवर्ड वेगवेगळा ठेवा. आपले बँकेचे व्यवहार नियमितपणे तपासा. अचानकपणे आपला मोबाईल फोन डिॲक्टीवेट झाल्यास त्वरीत मोबाईल कंपनीशी संपर्क करून माहिती घ्यावी. आपला फोन बंद असतांना ड्युप्लीकेट सिम कार्ड घेऊन आपल्या खात्यातील पैसे नेट बँकिंगद्वारे काढले जावू शकतात.
            राज्यातील प्रत्येक जिल्हयात सायबर पोलीस ठाणे निर्माण करून सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्रत्येक ठिकाणी सायबर प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे. यामध्ये या गुन्ह्यांचे विश्लेषण करून गुन्ह्याची पध्दत, कल, तंत्र आदिचा अभ्यास करून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. सायबर सेल तसेच सायबर पोलीस ठाणे निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.
----------
शैलेजा पाटील-देशमुख
विभागीय माहिती कार्यालय,
कोकण भवन, नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन