‘तुम्ही पिक कर्ज घेण्यास पुन्हा पात्र आहात’ : कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे घरपोच पत्र



अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.10-  शासनाने शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत  शेतकऱ्यांना कर्जमाफी, प्रोत्साहनपर लाभ आणि एकवेळ समझोता संधी असे लाभ दिले आहेत. त्यामुळे यंदा पिक कर्ज घेण्यासाठी अनेक शेतकरी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे ‘तुम्ही पिककर्ज घेण्यास  पात्र आहात’,  तरी शेतकऱ्यांनी पिक कर्ज घ्यावे, असे आवाहन करणारे पत्र जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वतः जिल्ह्यातील सर्व कर्जमुक्त शेतकऱ्यांना पाठविले आहे.
 शासनाने सन 20112-13 ते सन 2015-16 या चार वर्षातील  दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीमुळे पिक कर्ज न फेडू शकलेल्या शेतकऱ्यांना 28 जून 2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करुन कर्जमाफी दिली.
जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत  एकूण 18 हजार 73 शेतकऱ्यांना 41 कोटी 7 लाख 26 हजार 657 रुपये कर्जाची माफी देण्यात आली आहे. त्यामुळे हे शेतकरी सुद्धा कृषि कर्जाचा लाभ घेण्यास पात्र झाले आहेत. या शेतकऱ्यांनी पिक कर्ज घेण्यासाठी आपापल्या नजिकच्या विविध कार्यकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची शाखा, अन्य बॅंकांशी संपर्क साधून  पिक कर्जासाठी आपली मागणी नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे. हे पत्र पोस्टामार्फत शेतकऱ्यांच्या घरी पाठविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात पिक कर्जाचे सन 2018-19 करीता 246 कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे.  त्यात खरीप हंगामासाठी 201 कोटी 40 लाख तर रब्बी हंगामासाठी 44 कोटी 60 लाख रुपये उद्दिष्ट आहे. बॅंकांनी आतापर्यंत जे कृषि कर्ज वाटप केले आहे त्यात 6738 शेतकरी हे कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी आहेत. तर अन्य शेतकरी 14 हजार 428 आहेत. असे एकूण 21 हजार 166 शेतकरी खातेदारांनी यंदाच्या कृषि कर्जाचा (105 कोटी 99 लाख 78 हजार रुपये) लाभ घेतला आहे.
 पिक कर्ज मिळण्यासंदर्भात काही अडचणी आल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका सहाय्यक निबंधक किंवा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था  रायगड- अलिबाग यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांचा दूरध्वनी क्रमांक 02141-222013. व्यापारी बॅंकांमधून पिक कर्ज मिळण्यास अडचण आल्यास व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, तथा बॅंक ऑफ इंडिया रायगड -अलिबाग यांच्या कार्यालयाशी समक्ष अथवा 02141-222344 /222895 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
एक वेळ समझोत्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी  शासनाने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज  शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांपेक्षा जादा थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता (one time settlement) या योजनेला 30 सप्टेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 30 जून पर्यंत होती.  यासंदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  तालुज्का उपनिबंधक/ जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा व शासनाने वाढवलेल्या मुदतीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन