गोवर रुबेला लसीकरण मोहिमः जिल्ह्यात 3 लाख 75 हजार बालकांना लसीकरण


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत गोवर रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.  या अभियानात रायगड जिल्ह्यात 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील 7 लाख 93 हजार 451 बालकांना या लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान मंगळवार (दि.27 नोव्हेंबर) ते बुधवार (दि.12 डिसेंबर) अखेर या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 3 लाख 75 हजार 733 बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले,असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
 जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार बुधवार दि.12 डिसेंबर रोजी दिवसअखेर जिल्ह्यातील 210 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 58 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 7 हजार 25 विद्यार्थ्यांना तर 152 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 13 हजार 177 विद्यार्थ्यांना अशा एकूण 20 हजार 202 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. तर आज अखेर एकूण 1 लाख 95 हजार 847 मुले  व 1 लाख 79 हजार 886 मुली  असे एकूण 3 लाख 75 हजार 733 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. हे लसीकरण राबविण्यासाठी आरोग्य यंत्रणा आतापर्यंत जिल्ह्यातील 3985 शाळांपर्यंत पोहोचली आहे, अशी  माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली आहे.

Comments