रायगड जिल्ह्यातील 1 हजार 198 खेळाडूंना राज्य क्रीडा धोरणानुसार क्रीडा गुणांचा मिळणार लाभ


वृत्त क्रमांक :- 995                                                                                     दिनांक :- 20 जुलै 2020



अलिबाग, जि.रायगड,दि.20 (जिमाका):-  राज्याचे क्रीडा धोरण 2012 मधील शिफारशीनुसार राज्यातील इ.10 वी व 12 वी च्या जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविलेल्या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्यात येतात.
              रायगड जिल्हयातील एकूण 1 हजार 198 खेळाडूंना या क्रीडा गुण सवलतीचा लाभ होणार आहे. जिल्हास्तरावर प्राविण्य मिळविलेले किंवा विभाग स्तरावर सहभाग घेतलेल्या खेळांडूना 05 गुण, विभागस्तरावर प्राविण्य प्राप्त खेळाडूंना 10 गुण, राज्यस्तरावर सहभाग 10/12 गुण, राज्यस्तरावर प्राविण्य व राष्ट्रीय स्तरावर सहभाग 15 गुण, तर राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त खेळाडूंना 20 गुण याप्रमाणे लाभ देण्यात येणार आहे.
            एकूण 1 हजार 198 खेळाडू विद्यार्थ्यांपैकी इ.10 मुले -372, इ.10 मुली -281, इ.12 वी मुले -366, इ.12 वी मुली -179 यांना क्रीडा गुण मिळणार आहेत.
        या खेळाडूंमध्ये इ.10 वी मध्ये 6 राष्ट्रीय खेळाडू, 51 राज्यस्तरीय खेळाडू, 21 विभागस्तरीय खेळाडू व 575 जिल्हास्तरीय खेळाडू आहेत.  तर इ.12 वी मध्ये 9 राष्ट्रीय खेळाडू, 46 राज्यस्तरीय खेळाडू, 69 विभागस्तरीय खेळाडू व 421 जिल्हास्तरीय खेळाडू याप्रमाणे एकूण 15 राष्ट्रीय, 97 राज्यस्तरीय, 90 विभागस्तरीय व 996 जिल्हास्तरावरील प्राविण्य प्राप्त खेळाडू विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
      जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने क्रीडा गुणांचे प्रस्ताव दि.25 मार्च 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे सूचित करण्यात आले होते. त्यानुषंगाने जिल्ह्यातील विविध शाळांकडून प्रस्ताव सादर करण्यात आले होते.
तथापि मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊनचा विचार करता ज्या शाळांचे प्रस्ताव सादर करण्याचे बाकी होते, अशा परिस्थितीत जास्तीत जास्त खेळाडूंना याचा लाभ होईल, यासाठी शाळांना ईमेल व्दारे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कोविड 19 च्या परिस्थितीमुळे राज्यामध्ये लॉकडाऊन असल्‍याने अनेक राज्यामध्ये अनेक खेळाडूंचे प्रस्ताव सादर करणे बाकी असल्याने शासनाने त्यास मुदतवाढ देवून हे प्रस्ताव दि.20 मे 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास  सादर करण्याचा निर्णय घेतला. याचा लाभ रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना झाला आहे.
      जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडीक यांनी सर्व खेळाडूंचे तसेच या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक यांचेही अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन