डाक विभागातील निवृत्ती वेतनधारकाच्या समस्या सोडविण्यासाठी डाक अदालतीचे आयोजन
रायगड दि.15(जिमाका):-डाक विभागाच्या निवृत्ती वेतनधारकाच्या समस्या सोडवण्यासाठी पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई यांनी दि.27 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई रिजन कार्यालय, दुसरा माळा, पनवेल मुख्य पोस्ट ऑफिस इमारत नवीन पनवेल येथे पेन्शन डाक अदालत आयोजित करण्यात आली असून तक्रारदारांनी या डाक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा डाक अधीक्षक रायगड सुनील थळकर यांनी केले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. यामध्ये निवृत्तीधारकांच्या लाभाशी संबधित तक्रारी तसेच जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला आहे, ज्यांना तीन महिन्याच्या आत निवृतीवेतनाची पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणाचा या डाक आदालतीमध्ये निपटारा करण्यात येणार आहे. यात फक्त न्यायालयात असणारी, कायदेशीर प्रलंबित असणारी प्रकरणे, टीबीओपी, एमएसीपी, वेतनश्रेणी वाढवणे, शिस्तभंग हे विषय या अदालतीमध्ये समाविष्ट करता येऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे पेन्शनर असोसिएशन कडून आलेल्या प्रकरणावर ही या आदलती मध्ये निर्णय घेता येत नाही.
तक्रारदाराने अर्ज करताना निवृत्तीधारकांचे नाव, कार्यालयाचे नाव, निवृतीची तारीख, पिपिओ क्रमांक, पोस्टऑफिसचे नाव जिथून पेन्शन घेतली जात आहे, पोस्टाचा पत्त्ता, दूरध्वनी क्रमांक, थोडक्यात तक्रार अशा पद्धतीने अर्ज करावा. या पेन्शन अदालतीचा हेतू पेन्शन धारकांच्या समस्या वेगवान व प्रभावी रीतीने विनाविलंब सोडवणे हा आहे. या डाक अदालती धून डाक विभागाच्या निवृत्ती वेतन धारकांना असणाऱ्या समस्यावर, तक्रारीवर जागेवरच निर्णय घेऊन तोडगा काढण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. तक्रारदारांनी आपला अर्ज नवी मुंबई रिजनसाठी पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई रिजन कार्यालय, दूसरा माळा, पनवेल मुख्य पोस्ट ऑफिस इमारत नवीन पनवेल 410206 येथे पाठवावा.
00000000
Comments
Post a Comment