रोहा तालुक्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्याकामी दि.03 जानेवारी रोजी विशेष मोहीम
रायगड-अलिबाग,दि.31(जिमाका):- जिल्ह्यात पावसाळयामध्ये माहे जून ते ऑक्टोबर 2025 या महिन्यांत सतत पाऊस असल्या कारणाने मोजणी काम होऊ शकलेले नाही. त्यामुळे उप अधीक्षक भूमि अभिलेख रोहा कार्यालयाकडे मोठ्या प्रमाणात मोजणी प्रकरणे प्रलंबित राहिलेली आहेत. या मोजणी प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार व उपसंचालक भूमि अभिलेख कोंकण प्रदेश मुंबई अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख रायगड यांच्याडून या प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्याकामी विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्यामध्ये 126 प्रकरणे दि.03 जानेवारी 2026 या एकाच दिवशी मोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणांत मोजणीच्या नोटीस सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्या असून संबंधित अर्जदार व हितसंबंधित यांनी या दिवशी उपस्थित राहून आपल्या जमिनींची मोजणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख रायगड सुनिल इंदलकर यांनी केले आहे.
उप अधीक्षक भूमि अभिलेख रोहा कार्यालयाकडे माहे नोव्हेंबर 2025 अखेर एकूण 389 मोजणी प्रकरणे शिल्लक होती. त्यातील 226 मोजणी प्रकरणे मुदतबाह्य झालेली असून तीन महापेक्षा जास्त कालावधीवर प्रलंबित आहेत. पैकी 36 प्रकरणांत मोजणी पूर्ण झालेली असून 64 प्रकरणांत माहे डिसेंबर 2025 मध्ये मोजणी तारखा लावण्यात आलेल्या आहेत. उर्वरीत 126 मुदतबाह्य मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत.
या विशेष मोहिमेमुळे तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर प्रकरणांचा निपटारा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विशेष मोहीम अंतर्गत दि.03 जानेवारी 2026 रोजी जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील कर्मचारी यांच्या सेवा वापरून एकाच दिवशी रोहा तालुक्यातील 126 मोजणी प्रकरणांची मोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रलंबित मोजणी प्रकरणे एकाच दिवशी मोजणी होऊन, निकाली होऊन त्याचा वेगाने निपटारा होण्यास मदत होणार असून पुढील प्रकरणांना लवकर तारखा मिळण्यास मदत होणार आहे.
0000000
Comments
Post a Comment