15 जानेवारी रोजी राज्य क्रीडा दिनाचे आयोजन आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय विशेष प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा होणार गौरव सोहळा
.
रायगड-अलिबाग,दि.14(जिमाका) :- ऑलिम्पिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिनानिमित्त रायगड जिल्ह्याचा राज्य क्रीडा दिन दि.15 जानेवारी 2026 रोजी पोलीस मुख्यालय, कळंबोली नवी मुंबई येथे सायंकाळी 5.00 वाजता साजरा करण्यात येणार असून या राज्य क्रीडा दिनी रायगड जिल्ह्यातील सन 2025-26 मध्ये सर्व राष्ट्रीय, राज्य क्रीडा पुरस्कारार्थी, आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू तसेच राष्ट्रीय शालेय पदक विजेते खेळाडू यांना विविध मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व दिवंगत खाशाबा जाधव यांच्या क्रीडा कामगिरी व कार्याचा परिचय होण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारीत पुस्तकाचे वितरण केले जाणार असून या राज्यस्तरीय कार्यक्रमास खेळाडू आणि क्रीडा प्रेमींनी मोठ्या प्रमाणात सहभागी, व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी केले आहे.
स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते म्हणून ज्यांचा संपूर्ण भारताला अभिमान आहे असे महाराष्ट्राचे सुपुत्र दिवंगत खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये केलेल्या कामगिरीचा गौरव व नवोदित खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांचा जन्मदिन दि.15 जानेवारी, हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याकरिता शासनाने मान्यता दिली आहे. या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील प्रत्येक शाळा महाविद्यालयातून राज्य कीडा दिन साजरा करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत.
याकरिता अनुदानित, विनाअनुदानित शैक्षणिक संस्था, खाजगी विद्यापीठे, एकविध जिल्हा/राज्य क्रीडा संघटना, क्रिडा मंडळे, क्रिडा अकॅडमी, शासनाच्या क्रीड़ा योजनांचा लाभ मिळालेल्या सर्व अनुदानित संस्था यांनी आपल्या क्षेत्रात राज्य क्रीडा दिन मोठ्या प्रमाणात साजरा करावा तसेच राज्य क्रीडा दिनाचे औचित्य साधून दिवंगत खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान यावर व्याख्यानाचे आयोजन करणे, क्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी रॅलीचे तसेच मॅरेथॉनचे आयोजन करणे, विविध खेळांचे प्रदर्शनीय सामने आयोजित व विजेत्यांना पुरस्कार वितरण करणे, खेळाडूं समवेत परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन करणे व क्रीडाविषयक उपक्रमाचे आयोजन करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment