स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती रॅली कार्यक्रम संपन्न
रायगड-अलिबाग,दि.21(जिमाका) :- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर स्वीप (Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रमांतर्गत (दि.20/01/2026) रोजी आदिवासी वाडी, मेंदडीकोंड, ता.म्हसळा येथे मतदार जनजागृती रॅली कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करणे व शंभर टक्के मतदान साध्य करणे हा होता.
या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती म्हसळा श्री.साबळे, वरिष्ठ विस्तार अधिकारी पंचायत समिती म्हसळा अरविंद मोरे, झोनल ऑफिसर मेंदडी आनंद घरत, तसेच संपूर्ण स्वीप समिती उपस्थित होती.
रॅलीची सुरुवात मार्गदर्शकांच्या उपस्थितीत करण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी हातात फलक घेऊन “माझे मत – माझा हक्क”, “प्रत्येक मत अमूल्य आहे”, “लोकशाही मजबूत करा – मतदान करा” अशा घोषणा देत जनजागृती केली. मार्गदर्शकांनी मतदारांना मतदानाचा अधिकार, मतदार नोंदणी प्रक्रिया, EVM व VVPAT बाबत माहिती, तसेच निर्भय व नैतिक मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले. नागरिकांनी कोणत्याही दबावाशिवाय मतदान करावे व लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
या रॅलीला सर्व गावकरी व मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलावर्ग, युवक व ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग लाभला. कार्यक्रमामुळे मतदारांमध्ये सकारात्मक जागृती निर्माण झाली असून सर्वांनी आगामी निवडणुकीत शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प व्यक्त केला. एकूणच स्वीप अंतर्गत आयोजित मतदार जनजागृती रॅली अत्यंत यशस्वी ठरली. मार्गदर्शकांचे मोलाचे मार्गदर्शन, स्वीप समितीचे नियोजन व ग्रामस्थांचा सहभाग यामुळे लोकशाही मूल्यांची जाणीव अधिक दृढ झाली.
0000000

Comments
Post a Comment