कौशल्याधारित शिक्षणातून रोजगाराच्या संधी निर्माण करा – जिल्हाधिकारी किशन जावळे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’चा शुभारंभ; रायगडमध्ये जे.एस.एम. महाविद्यालयात जिल्हास्तरीय उपक्रमास प्रारंभ

 


 

रायगड-अलिबाग, दि.29(जिमाका) : राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत कोकण आणि नाशिक विभागात आयोजित करण्यात आलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभा’चा  शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  आज करण्यात आला. त्याच अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील रोजगार महाकुंभाचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते अलिबाग येथील जे.एस.एम. महाविद्यालयात करण्यात आला.

युवकांनी केवळ पुस्तकी शिक्षणावर अवलंबून न राहता विविध क्षेत्रांतील कौशल्य आत्मसात करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.

सेवा संकल्प अभियान (१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६) अंतर्गत आज कोकण आणि नाशिक विभागात एकाच दिवशी ४०० पेक्षा अधिक ठिकाणी आणि रायगड जिल्ह्यात १२ ठिकाणी रोजगार मेळावे /प्लेसमेंट आयोजित करण्यात आले आहेत.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग आणि जे.एस.एम. महाविद्यालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथील या रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात आले.

एकाच वेळी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांना विविध उद्योग, आस्थापना व रोजगारदात्यांशी थेट संवाद साधण्याची आणि उपलब्ध रोजगाराच्या संधी जाणून घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यावेळी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. ॲड. गौतम पाटील, जे.एस.एम. महाविद्यालयाच्या प्राचार्य सोनाली पाटील, उपप्राचार्य श्री. गायकवाड, विविध उद्योगांचे प्रतिनिधी, कौशल्य विकासाशी संबंधित अधिकारी-कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने युवा विद्यार्थी व रोजगाराच्या शोधात असलेले उमेदवार उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बदलत्या रोजगाराच्या गरजा लक्षात घेऊन युवकांनी शिक्षणासोबतच कौशल्य विकासावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळविणे पुरेसे नसून संबंधित क्षेत्रात प्रत्यक्ष काम करण्याची क्षमता, तांत्रिक ज्ञान, संवादकौशल्य, संगणकाचे ज्ञान आणि उद्योगाच्या गरजेनुसार आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. युवकांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निश्चित करून त्यामध्ये प्रावीण्य मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

 

 

कौशल्यामुळे रोजगारक्षमतेत वाढ

ग्रामीण तसेच शहरी भागात विविध प्रकारच्या कुशल मनुष्यबळाची मोठी गरज आहे. प्लंबिंग, विद्युत काम, वाहन दुरुस्ती, संगणक, तांत्रिक सेवा, क्रीडा तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाला मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे युवकांनी आपल्या अंगभूत क्षमता आणि सर्जनशीलतेचा उपयोग करून एखाद्या कौशल्यात प्रावीण्य मिळवावे. एखाद्या कामात कौशल्य आणि प्रावीण्य प्राप्त केल्यास त्या व्यक्तीची रोजगारक्षमता वाढण्याबरोबरच समाजातही त्याचे स्वतंत्र स्थान निर्माण होते.

युवक आणि उद्योग क्षेत्रामध्ये थेट दुवा

रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून युवक आणि विविध उद्योगांचे प्रतिनिधी यांच्यात थेट संवाद घडवून आणण्यात येत आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी उपलब्ध संधींची माहिती घेऊन संबंधित उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधावा, आपला बायोडाटा सादर करावा आणि मुलाखतीला आत्मविश्वासाने सामोरे जावे. उमेदवारांनी स्वतःच्या कौशल्यांची प्रभावी मांडणी करून आपल्या क्षमतेनुसार योग्य रोजगाराची संधी मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी केले.

रोजगार महाकुंभातून कौशल्याला संधी

 या रोजगार महाकुंभाचा उद्देश युवकांच्या कौशल्याला योग्य रोजगाराची संधी मिळवून देणे तसेच उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हा आहे. युवक, प्रशिक्षण संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी  मेळाव्यामध्ये सहभागी संस्थांच्या विविध स्टॉल्सना भेट देऊन उपलब्ध रोजगार व भरती प्रक्रियेची माहिती घेतली.

राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उपस्थितांना दाखविण्यात आले. कार्यक्रमास विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन